Other
एसटी वर्कशॉपजवळ मृतदेह आढळल्याने खळबळ

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह एसटी वर्कशॉपच्या मागील भागात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना सोमवारी (२१ जुलै) दुपारी उघडकीस आली.
जयेश वसंत काळे (वय ४५, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. स्थानिक नागरिकांनी परिसरात एका व्यक्तीला अचेत अवस्थेत पाहिले. त्यानंतर पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती देण्यात आली. त्यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.