ब्रेकिंग : जळगाव शहरात पुन्हा गोळीबार; एक गंभीर, तिघे जखमी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । शहरातील शनिपेठ परिसरातील कांचननगर भागात रविवारी रात्री सुमारे १० वाजेच्या सुमारास किरकोळ वादातून झालेल्या गोळीबारात तिघे युवक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर जिल्हा शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, कांचननगर भागात दोन युवकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. वाद चिघळत जाऊन त्याचे रूपांतर गोळीबारात झाले. या गोळीबारात आकाश टपऱ्या, गणेश सोनवणे व तुषार उर्फ साबू हे तिघे जखमी झाले आहेत. घटनास्थळावर तात्काळ स्थानिक नागरिकांची गर्दी झाली.
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत गोळीबार करणाऱ्यांमध्ये दोन जणांची नावे समोर येत असून अधिकृत माहिती पोलीसांकडून अद्याप समोर आलेली नाही.
घटनेमागील नेमके कारण काय, कोणत्या प्रकारचे शस्त्र वापरण्यात आले आणि आरोपींची अटक झाली आहे की नाही याबाबत तपास सुरू आहे.





