जानवे जंगलात सापडली कवटी व हाडं; अडीच महिन्यांपूर्वी हरवलेल्या महिलेसोबत संबंधित असल्याचा संशय

जानवे जंगलात सापडली कवटी व हाडं; अडीच महिन्यांपूर्वी हरवलेल्या महिलेसोबत संबंधित असल्याचा संशय
अमळनेर (पंकज शेटे) :- तालुक्यातील जानवे जंगल परिसरात बकऱ्या चारणाऱ्या गुराख्यांना मानवी कवटी, काही हाडं आणि एक आधार कार्ड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हे आधार कार्ड अडीच महिन्यांपूर्वी सुरत येथून बेपत्ता झालेल्या वैजंताबेन भगवान भोई (वय ५०, रा. कुबेरनगर कतार गाम दरवाजा, सुरत) यांचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही बाब लक्षात येताच गुराख्यांनी अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना माहिती दिली. त्यांनी तत्काळ हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळी मानवी हाडं, केस, काही वस्तू आणि महत्त्वाचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आले.
या तपासात अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी विनायक कोते, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, नामदेव बोरकर, समाधान गायकवाड तसेच कर्मचारी काशिनाथ पाटील, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, सागर साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
दरम्यान, वैजंताबेन भोई या १७ मे २०२५ रोजी बेपत्ता झाल्याची नोंद सुरतच्या बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये झाली होती. सद्यस्थितीत अमळनेर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण व यामागील सत्य स्पष्ट होणार असल्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले.






