सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या मागणीला जिल्हा प्रशासनाचा प्रतिसाद…

जळगांव : श्री गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचला आहे, काही मंडळांच्या आगमन सोहळ्यास सुरवात झाली असून देखील शहरातील श्री स्थापना व विसर्जन मार्गातील खड्डे, विद्युत तारा, झाड छाटणी तसेच मुख्य म्हणजे गणेश भक्तांची मन हेलावून टाकणारी मेहरून तलावात येणाऱ्या सांडपाण्याची अडवणूक असे विविध प्रश्न होते.
त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री सचिन नारळे यांच्या नेतृत्वात महामंडळाचे पदाधिकारी तथा गणेश मंडळांचे कार्यकर्ते यांनी मेहरून तलावास भेट देऊन ती बाब मनपा प्रशासनाच्या लक्ष्यात आणून दिली त्यासोबत जिल्हा प्रशासन व श्री गणेश मंडळ यांच्यातील झालेल्या समन्वय बैठकीत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारींचा तगादा लावला व त्वरित प्रशासनास जागे करुन श्री स्थापणेपूर्वीच काम सुरू करण्यास भाग पाडले.
या कामात प्रामुख्याने मेहरून तलावात येणारे सांडपाणी रोखणे व विसर्जन स्थळावरील गाळ काढणे, तसेच मुख्य श्री विसर्जन मार्ग तथा श्री स्थापना स्थानावरील रस्त्यावरील खड्डे, व विद्युत तारा उंच करण्याचे काम प्रशासनातर्फे हाती घेण्यात आले आहे .
प्रशासनाने दाखविलेल्या कार्यतत्परतेबद्दल सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे समाधान व्यक्त करण्यात आले.
समन्वय समितीची स्थापना-: उत्सवात येणाऱ्या विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच प्रशासनासोबत समन्वय साधण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री सचिन नारळे यांनी समन्वय समिती नियुक्त केली आहे यात महामंडळाचे जेष्ठ पदाधिकारी किशोर भोसले, दिपक जोशी, मुकुंद मेटकर, किशोर देशमुख यांच्या नेतृत्वात समन्वयक सूरज दायमा,जगदीश नेवे, राहुल परकाळे, राकेश तिवारी, धनंजय चौधरी, भूषण शिंपी, मयूर बारी, चेतन सनकत, अजय बत्तीसे, चेतन पाटील, विनोद अनपट, मीनल पाटील, कल्पेश तीलकपुरे, आदित्य कुकरेजा आदींची नेमणूक करण्यात आली आहे






