हृदयद्रावक : पहूरजवळ कार पेटल्याने विवाहितेचा करुण अंत

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव–छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर पहूरजवळ आज दुपारी घडलेल्या हृदयद्रावक अपघातात कार पेटून एका विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाला. जान्हवी संग्राम मोरे (वय २१, मूळ रा.बोहर्डी, ता.भुसावळ) असे मयत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील बोहर्डी येथील माहेर असलेल्या जान्हवी यांना घेऊन पती चार चाकीतून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. पिंपळगाव फाटा, पहूरजवळ कारचा टायर अचानक फुटला. त्यामुळे कार महामार्गावरील दुभाजकावर आदळली. अपघातानंतर कारमधून धूर व ज्वाळा निघू लागल्या.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी व वाहतूक पोलिसांनी तत्काळ कारच्या पुढील काचा फोडून पती संग्राम मोरे यांना बाहेर काढण्यात यश मिळवले. मात्र सुरुवातीला कारमध्ये आणखी एक महिला असल्याची माहिती स्पष्ट झाली नाही. नंतर त्यांनी आत पत्नी असल्याचे सांगितल्यानंतर बचावकार्य अधिक तातडीने सुरू झाले.
ग्रामस्थ, वाहतूक पोलीस, पहूर पोलीस, महामार्ग पोलिस, आरटीओ कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रित प्रयत्न करत दगडांनी काच तोडून जान्हवी यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत कारने मोठ्या प्रमाणात पेट धरला होता. आग भडकत गेल्याने जान्हवी यांना बाहेर काढणे शक्य झाले नाही आणि त्यांचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला.
वाकोद येथून टँकर मागवून गाडी विझविण्यात आली. तसेच काही वेळात जामनेर नगरपरिषद अग्निशमन दलाची गाडीही घटनास्थळी दाखल झाली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मयत महिला यांचे प्रेतावर इन्क्वेस्ट पंचनामा करून शवविच्छेदन झाल्यावर प्रेत नातेवाईकांचे ताब्यात दिले आहे. पहूर पो.स्टे.ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी पहूर पो.स्टे. प्रभारी अधिकारी प्रमोद कठोरे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहे.





