यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचा उपक्रम: ‘ऑपरेशन प्रस्थान’ अंतर्गत शाळकरी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे आणि सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण

यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचा उपक्रम: ‘ऑपरेशन प्रस्थान’ अंतर्गत शाळकरी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे आणि सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण
यवतमाळ, प्रतिनिधी :
यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘ऑपरेशन प्रस्थान’ हा अभिनव उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण आणि संरक्षणात्मक प्रशिक्षण देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
याआधी या उपक्रमात रोजगार मेळावा, क्रीडा महोत्सव अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच मालिकेत दि. 21 एप्रिल 2025 ते 29 मे 2025 या कालावधीत 1800 शाळकरी मुलींना कराटेचे स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून स्वसंरक्षणाची क्षमता वाढली आहे.

ऑपरेशन प्रस्थानचा दुसरा टप्पा 7 जुलै 2025 पासून सुरू झाला असून, यामध्ये जिल्ह्यातील 30,000 विद्यार्थ्यांना मोफत कराटे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासोबतच सायबर सुरक्षा, सोशल मिडियाचा सुरक्षित वापर, ओळखीच्या व अनोळखी व्यक्तींशी संवाद करताना घ्यावयाची काळजी, पासवर्ड सुरक्षा, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, नशामुक्त समाज निर्मिती, नैतिकता व सामाजिक जबाबदारी यावरही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दि. 7 आणि 8 जुलै रोजी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, यवतमाळ येथे आयोजित प्रशिक्षण सत्रात 678 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कराटे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये आनंद भुसारी व त्यांच्या टीमने कराटेचे धडे दिले. तसेच पोलीस अधिकारी आणि तज्ज्ञांनी विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
पोनि. सेवानंद वानखेडे यांनी नैतिकता व नीतिमत्तेचे महत्त्व सांगितले, सपोनि तायडे व पोलीस अमलदार अजय निंबोळकर यांनी सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध याबाबत माहिती दिली. डॉ. माने मॅडम यांनी आरोग्य व मानसिक बदलांवर मार्गदर्शन केले, तर सपोनि संतोष मनवर यांनी नशा व व्यसनाचे दुष्परिणाम सांगितले. वाहतूक पोलीस अधिकारी पोनि. देवकते यांनी वाहतुकीचे नियम आणि अपघातांपासून बचाव याबाबत सखोल माहिती दिली.
सदर प्रशिक्षणाचा पुढील टप्पा दि. 9 आणि 10 जुलै रोजी संतमाळ पब्लिक स्कूल आणि वीनादेवी दर्श इंग्लिश मिडीयम स्कूल, यवतमाळ येथे राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोनि. दीपमाला भैडे, पोनि. वागतकर, सपोनि शुभांगी गुल्हाने, सपोनि माधुरी उंबरकर, HC निलेश खंदारे, पोलीस अमलदार देवेंद्र गोडे, महिला पोलीस अमलदार नलिनी धोटे, भारती चव्हाण, जया काळे आदींनी आयोजनात सहभाग घेतला.
कार्यक्रमास पोनि. यशोधरा मुनेश्वर, मुख्याध्यापक ग्रपाटे सर, उपमुख्याध्यापक राऊत मॅडम, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वसंरक्षण, सायबर सुरक्षेबाबत जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होत आहे.






