इंस्टाग्रामवर शिवीगाळ : जळगावच्या तरुणाचा यावलमध्ये मारहाणीत मृत्यू

महा पोलीस न्यूज । दि.३ डिसेंबर २०२५ । जळगाव शहरातील समतानगर परिसरात राहणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार यावल ते बोरावल दरम्यान घडली असून याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, चंद्रकांत वामन तायडे रा.बौद्धवाडा, समतानगर यांचा मुलगा तुषार चंद्रकांत तायडे वय-१९, हा मजुरी काम करतो. तुषार याच्या आजीचे निधन झाले असल्याने तो अंत्यविधीसाठी परसाडे ता.यावल येथे दुचाकीने गेलेला होता. अंत्यविधी आटोपल्यावर दि.२ रोजी तो दुपारी ३ वाजता दुचाकीने जळगाव येण्यास निघाला तर वडील मुक्कामी परसाडे येथे थांबले.
रात्री ८.३२ वाजता चंद्रकांत तायडे यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला आणि त्याने तुमच्या मुलाला यावल रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले. त्यांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेतली असता तुषार याच्यावर उपचार सुरू होते. मुलगा तुषार यास विचारणा केली असता यावल ते बोरावल दरम्यान पाटाच्या पुलाजवळ ६ वाजेच्या सुमारास मला विक्रम सोनवणे आणि राहुल सोनवणे यांच्यासह ६ ते ७ जणांनी मारहाण केल्याचे त्याने सांगितले.
दुखापत जास्त असल्याने तुषार यास यावल रुग्णालयातून जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आले. रात्री उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.






