ब्रेकिंग : भुसावळ हादरले! रेल्वे बोगद्याजवळील मंदिराच्या पूजार्याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या
रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; खुनाचे कारण अद्याप गूढ, फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू

ब्रेकिंग : भुसावळ हादरले! रेल्वे बोगद्याजवळील मंदिराच्या पूजार्याची डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या
रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; खुनाचे कारण अद्याप गूढ, फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू
भुसावळ, प्रतिनिधी : शहरालगत असलेल्या झेडटीआरआय (ZTRI) बोगद्याजवळील मंदिराच्या मुख्य पूजार्याची अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात टणक वस्तूने प्रहार करून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (२९ जून) सकाळी उघडकीस आली आहे. या भीषण हत्याकांडामुळे भुसावळ शहर आणि रेल्वे परिसरात कमालीची शांतता आणि घबराट पसरली असून, पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी चक्रे गतिमान केली आहेत.
संतोष रघुवीर मंचल (वय ५५, रा. झेडटीआरआय परिसर, भुसावळ) असे खून झालेल्या दुर्दैवी पूजार्याचे नाव आहे. ते आरपीडी रस्त्यालगत लष्करी डेपोपासून (Military Depot) सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या तीन मंदिरांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पूजा-अर्चा करण्याचे काम पाहत होते.
कुटुंबीय मंदिरात पोहोचताच उडाली दाणादाण!
सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पूजारी संतोष मंचल यांचे कुटुंबीय नेहमीप्रमाणे मंदिरात गेले होते. यावेळी मंदिराच्या आवारात संतोष मंचल यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्या डोक्यावर कोणत्यातरी जड आणि टणक वस्तूने जबर प्रहार करून त्यांना मृत्यूच्या घाटात उतरवले होते. कुटुंबीयांच्या आक्रोशानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली आणि तातडीने भुसावळ शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची धाव
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक (DySP) केदार बारबोले, शहर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, हवालदार संदीप पालवे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात रवाना केला.
खुनाचे कारण अस्पष्ट; फॉरेन्सिक पथक दाखल
हा खून चोरीच्या उद्देशाने झाला, की जुन्या वैयक्तिक वैमनस्यातून अथवा अन्य कोणत्या आर्थिक-जमीन वादातून झाला? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. खुनाचा छडा लावण्यासाठी जळगाव येथून तातडीने ठसे तज्ज्ञ (Fingerprint Experts) आणि फॉरेन्सिक लॅबच्या (Forensic Team) पथकाला पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावरून काही महत्त्वाचे नमुने गोळा करण्यात आले असून, संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






