जुना वाद उफाळला : पब्जी खेळणाऱ्या तरुणावर सपासप वार, प्रकृती चिंताजनक

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात जुन्या वैमनस्यातून एका १८ वर्षीय तरुणावर चार जणांनी कोयता, चाकू व इतर शस्त्रांनी वार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. जखमी तरुणाचे नाव हर्षल कुणाल पाटील (वय १८, रा.एकनाथ नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि.१४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजता हर्षल पाटील हा मित्र नितीन राजेंद्र देशमुख वय-२२ याच्यासह रामेश्वर कॉलनीतील राज शाळेजवळ पब्जी खेळत बसला होता. दोन वर्षापूर्वीच्या जुन्या वादातून चार अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांनी लोखंडी कोयता, चाकू व इतर धारदार वस्तूंनी हर्षल यांच्या डोक्यावर, मानेवर व पाठीवर अनेक वार केले.
हल्ल्यात हर्षल गंभीररित्या जखमी झाला असून त्याला मित्रांनी खाजगी वाहनाने तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले असून, त्याची स्थिती अद्याप नाजूक आहे.
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी धावले. तपास सुरू असून, हल्लेखोरांची शोध मोहीम राबवली जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे रामेश्वर कॉलनी परिसरात भीतीचे वातावरण आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :






