जळगावातील पोलिसांचा ‘ऑन ड्यूटी’ ‘साईड बिझनेस’
वाहतूक शाखेच्या पोलिसांचा साईड बिझनेसचा धक्कादायक प्रकार उघड; शासकीय वाहनांचा गैरवापर?

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस दलातील काही अधिकारी आणि कर्मचारी आपले मूळ कर्तव्य विसरले असून अतिरिक्त पैसा कमावण्याच्या नादात त्यांनी साईड बिझनेस सुरु केले आहे. बाहेरील इतर काही व्यवसाय, उद्योग किंवा नेटवर्क मार्केटिंग करून पैसे कमावण्याचा प्रयत्न पोलीस दादा करीत आहेत. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचे असेच काही फोटो व्हायरल होत असून ते शासकीय वाहन घेऊन जात आपल्या जोडधंदा करत असल्याचे त्यात दिसून येते.
जळगाव जिल्हा पोलीस दलातील वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे कर्मचारी शासकीय वाहनांचा गैरवापर करून साईड बिझनेस करत असल्याचे उघड झाले आहे. पाळधी ते एरंडोल दरम्यान पेट्रोल पंप, दुकाने आणि हॉटेल परिसरात हे कर्मचारी नागरिकांना हेरून वजन कमी करणे, वजन वाढविणारी उत्पादने आणि वेट लॉस क्लासेसची प्रचार-प्रसिद्धी करत असल्याचे समजले आहे.
जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीच्या घटना, पोलिसांचे व्हायरल फोटो आणि व्हिडिओ यामुळे चर्चेत असताना हा नवा प्रकार समोर आला आहे. काही पोलीस कर्मचारी आपले मूळ कर्तव्य विसरून अतिरिक्त कमाईसाठी बाह्य व्यवसायांवर लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे पोलीस दलाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील एक माहिती अधिकार कार्यकर्ते लवकरच याप्रकरणी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल करणार आहेत. या तक्रारीनंतर पोलीस अधीक्षक यासंदर्भात अशा पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा प्रकार गंभीर असून, पोलीस दलातील शिस्त आणि जबाबदारीवर प्रश्न उपस्थित करणारा आहे.