चर्चा तर होणारच.. जळगाव ‘एलसीबी’च्या खुर्चीवर बसणार कोण?
महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांची सेवानिवृत्ती दि.३१ मे रोजी होणार आहे. पोलीस अधीक्षक पदानंतर संपूर्ण जिल्ह्यावर मदार असलेले पद म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी). जळगावच्या एलसीबी निरीक्षकपदी वर्णी लागावी म्हणून अर्धा डझन नावे चर्चेत असून त्यात माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे सांगणे मात्र जरा अवघडच आहे. तुर्तास तरी आठवडाभर हा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता असून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच नवा अधिकारी मिळणार आहे.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक पद नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहे. स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक पद म्हणजे पोलीस अधीक्षकांनंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था हाताळणारे एकमेव पद असते. विद्यमान वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचा सेवा कालावधी दि.३१ मे २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. किसनराव नजनपाटील सेवानिवृत्त होणार असल्याने त्यांच्या जागी आपली वर्णी लागावी म्हणून अनेकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. सध्या चर्चेत असलेल्या अर्धा डझन नावांमध्ये ३ युवा अधिकारी असून उर्वरित ३ अधिकारी अनुभवी आणि सेवाकाळाने वरीष्ठ आहेत.
कोण-कोण आहे शर्यतीत?
सध्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक पदासाठी जळगावात अनेक वर्ष सेवा बजावलेले आणि सध्या धुळे येथे असलेले निरीक्षक जयपाल हिरे, गोंदिया एलसीबीची जबाबदारी सांभाळलेले आणि सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड, जळगावात अगोदर बरेच वर्ष सेवा देऊन पुन्हा जिल्ह्यात परतत जामनेर पोलीस ठाणे सांभाळणारे किरण शिंदे, जळगाव जिल्ह्याशी जवळचा संबंध असलेले यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर, नाशिक ग्रामीण एलसीबीची जबाबदारी सांभाळलेले आणि सध्या रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कुटे, नागपूर स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांची नावे सध्या चर्चेत आहेत. शिवाय आणखी १-२ नावे अधून मधून समोर येत असून ते देखील शर्यतीत आहे.
नेते मंडळी कुणाला देणार पसंती
जळगाव जिल्ह्यात पोलीस प्रशासनाशी संबंधित कामात माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांचे वर्चस्व राहिले आहे. सध्याची परिस्थिती पाहता सत्ता नसल्याने एकनाथराव खडसे काहीसे अलिप्त असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे वर्चस्व वाढले आहे. नवीन अधिकाऱ्याला दोन्ही मंत्र्यांची संमती तर लागणारच असून त्यातच मंत्री अनिल पाटील यांचा देखील होकार घ्यावा लागणार आहे. इच्छुकांनी मंत्र्यांच्या भेटी सुरु केल्या असून आमदार आमदार आणि इतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून देखील वशिला लावण्यास सुरुवात केली आहे. यंदा एलसीबी निरीक्षक पदाच्या शर्यतीत जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडून देखील वशिला लावला जाण्याची शक्यता आहे.
पोलीस अधिक्षकांसाठी महत्वाचा अधिकारी
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना जिल्ह्यात ५ महिने झाले तरी अद्याप पूर्णतः जिल्हा त्यांना उलगडला नाही. गेल्या काही महिन्यात जिल्ह्यात अनेक मोठ्या घटना घडल्या असून नुकतेच पार पडलेली लोकसभा निवडणूक शांततेत पार पडली आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा निवडणूक लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखणे गरजेचे आहे. कोणतीही मोठी घटना, जातीय तणाव किंवा बंदोबस्त असल्यास इतर सर्व अधिकाऱ्यांप्रमाणेच स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक देखील महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात. पोलीस अधीक्षक देखील योग्य अधिकारी निवडण्यासाठी सर्व माहिती घेऊनच एखाद्या संयमी आणि जबाबदारी अधिकाऱ्याला प्राधान्य देतील हे निश्चित.