हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

महा पोलीस न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने एका २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. किशोर बाळू पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ जुलै रोजी दुपारी शेतीची कामे आटोपून किशोर पाटील घरी विश्रांती घेत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यात ते पलंगावरून खाली कोसळले आणि त्यांना गंभीर मार लागला. कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ मुक्ताईनगर येथील रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
किशोर पाटील यांच्या पश्चात आजी-आजोबा, आई-वडील, दोन भाऊ, पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काल सायंकाळी सुकळी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईकांसह परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या घटनेबाबत मयताचे काका पंढरीनाथ शालिकराव पाटील (वय ३९) यांनी मुक्ताईनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.