ब्रेकिंग : गे डेटींग ॲपवरून रूमवर बोलावले, मसाज केला आणि..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील एका गे तरुणाला काही महाविद्यालयीन तरुणांनी गे डेटिंग ॲपच्या माध्यमातून आपल्या रूमवर बोलावले. रात्री त्याच्याकडून मसाज करून घेतला आणि त्या तरुणांनी गे तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना दि.२६ रोजी मध्यरात्री १२.३० वाजता घडली. याप्रकरणी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एक ३२ वर्षीय तरुण गे डेटिंग ॲप ‘ग्रिन्डर’ वापरत होता. ॲपच्या माध्यमातून सोमवारी त्याचा परिचय शहरातीलच एका महाविद्यालयीन तरुणाशी झाला. तरुणाने त्याला आपल्या रूमवर बोलावले. त्याठिकाणी समोरील तरुणाने गे कडून मालीश करून घेतली.
मित्रांना बोलवून केली मारहाण
मालिश केल्यानंतर तरुणाने गे तरुणाला पैसे न देता आपल्या इतर मित्रांना बोलावले. खोलीत चोर घुसल्याचे सांगून त्याने मित्रांकडून त्या तरुणाला बेदम मारहाण केली. मंगळवारी याप्रकरणी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात देखील घडला होता प्रकार
गेल्या महिन्यात पुणे शहरातील नांदेड सिटी परिसरात देखील असाच प्रकार घडला होता. ‘ग्रिन्डर’ या ॲपवर ओळख करून काही तरुणांनी एकाला बोलावले. त्याला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि एका मैदानावर नेऊन त्याच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ बनवून त्याला ब्लॅकमेल केले. आरोपीने पीडित तरुणाकडून १० हजार रुपयांची खंडणी मागितली आणि पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी नांदेडसिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.






