जळगाव रेल्वे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग
नवीन तिकीट घर परिसरात घडली घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

जळगाव रेल्वे स्टेशनजवळ कोळसा मालगाडीच्या बोगीला आग
नवीन तिकीट घर परिसरात घडली घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी सकाळी कोळसा वाहतूक करणाऱ्या मालगाडीच्या एका बोगीला अचानक आग लागल्याने काही काळ खळबळ उडाली. उड्डाण पुलाजवळील नवीन तिकीट घर परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या कोळशाने भरलेल्या मालवाहू रेल्वेच्या पाचव्या बोगीतून अचानक धूर निघत असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. यानंतर स्टेशन प्रबंधक एस. एस. ठाकूर यांनी सकाळी सुमारे ११ वाजून ४० मिनिटांनी शिवाजीनगर अग्निशमन केंद्राला तातडीची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाचे जवान तत्काळ बंबासह घटनास्थळी दाखल झाले. वाहन चालक किरण महाजन तसेच फायरमन शिवाजी तायडे आणि मनोज पाटील यांनी तत्परतेने आग विझवण्याची मोहीम हाती घेतली. त्यांच्या जलद आणि नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे काही वेळातच आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आले.
दरम्यान, घटना गजबजलेल्या नवीन तिकीट घर परिसरात घडल्याने आग पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक अंदाजानुसार, तीव्र उष्णता, कोळशातील अंतर्गत घर्षण किंवा वाढलेल्या तापमानामुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.






