
महापौरांच्या पाहणीत वॉर्ड ११ मधील प्रश्न ऐरणीवर
पथदिवे, गटारी, कचरा आणि मांसविक्री दुकानांबाबत महापौर दीपमाला काळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
जळगाव, प्रतिनिधी : शहरातील स्वच्छता आणि नागरी समस्यांच्या निवारणासाठी महापौर दीपमाला काळे यांनी ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियान’ अंतर्गत बुधवारी (दि. २८ ऑक्टोबर) वॉर्ड क्रमांक ११ मधील विविध भागांची पाहणी केली. यावेळी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. स्वच्छता, पथदिवे, गटारी, पाणीवापर आणि मांसविक्री दुकानांशी संबंधित प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पथदिव्यांची दुरुस्ती, पाण्याच्या अपव्ययावर लक्ष
वॉर्डातील जुन्या पथदिव्यांची तपासणी करून आवश्यकतेनुसार ते लवकरात लवकर बदलण्याचे निर्देश देण्यात आले. नळाला पाणी आल्यानंतर रस्ते धुण्यासाठी पाण्याचा वापर करणाऱ्या नागरिकांची तपासणी करून संबंधितांना नोटीस बजावण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या.
मोकळ्या भूखंडांची जेसीबीने स्वच्छता
रामानंद नगर बसस्थानक परिसर आणि घाटाजवळील वसाहतींमधील मोकळ्या भूखंडांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. जेसीबीच्या साहाय्याने या परिसरातील साफसफाई करण्यात आली. महापौरांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. तसेच, रामानंद नगर बस स्टॉप आणि घाट परिसरात वेगमर्यादा नियंत्रित करण्यासाठी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी नागरिकांनी केली.
शौचालय हटविण्यासह गटारी मोकळ्या करण्याचे आदेश
श्याम नगर परिसरातील अक्षय साठे नगरजवळील शौचालय तातडीने हटविण्याचे निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले. साठे नगरपुढील परिसरातील रस्ते आणि गटारी मोकळ्या करून नागरिकांची गैरसोय दूर करण्यासही सांगण्यात आले.
मांसविक्री दुकानांच्या परवान्यांची तपासणी
वाघ नगर परिसरातील मांसविक्री दुकानांच्या परवान्यांची तपासणी करून स्वच्छतेबाबत सक्त सूचना देण्यात आल्या. दुकानांमुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत, संबंधित दुकानांची चौकशी करून आवश्यकतेनुसार स्थलांतराबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. यापुढे मांसविक्री दुकानांना परवाने देताना सर्व बाबींचा सखोल विचार करण्याची सूचनाही महापौरांनी केली.
सफाई कर्मचाऱ्यांना रोटेशन पद्धतीने काम
वॉर्डातील स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांना रोटेशन पद्धतीने काम देण्याचे निर्देश देण्यात आले. कचरा संकलनासाठी बीव्हीजी कंपनीकडून पिकअप व्हॅन उपलब्ध करून घेऊन परिसरातील कचरा नियमित उचलण्यावर भर देण्यासही सांगण्यात आले.
अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित
या पाहणी दौऱ्यात स्थानिक नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे, संतोष पाटील आणि नगरसेवक पियुष कोल्हे उपस्थित होते. तसेच आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, बांधकाम विभागाचे अभियंता मनोज वनेरे, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर, मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे, स्वच्छता निरीक्षक मालती रंधे यांच्यासह आरोग्य, पाणीपुरवठा, विद्युत आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.







