Other

दिवाळीत रात्री १० वाजेनंतर फटाके वाजविण्यास बंदी; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

१२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी; शांतता क्षेत्रात फटाके वाजवल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

दिवाळीत रात्री १० वाजेनंतर फटाके वाजविण्यास बंदी; ध्वनी व हवा प्रदूषण टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन

१२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी; शांतता क्षेत्रात फटाके वाजवल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

जळगाव (विशेष प्रतिनिधी): दिवाळी सणाच्या काळात ध्वनी व हवा प्रदूषणामुळे होणारे अपायकारक परिणाम टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फटाके वाजविण्यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी या निर्देशांचे तंतोतंत पालन करून दिवाळी सण सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन पाचोरा विभागाचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी भूषण अहिरे यांनी केले आहे.

सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच फटाके वाजवण्यास मुभा

पर्यावरण (संरक्षण) नियमांमधील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. नियमांनुसार फटाके वाजवण्यासाठी सायंकाळी ६ ते रात्री १० ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत फटाके वाजवण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालये यांच्या सभोवतालच्या १०० मीटर परिसराला शांतता क्षेत्र (सायलेन्स झोन) घोषित करण्यात आले असून या भागात कोणत्याही वेळेत फटाके वाजवण्यास मनाई आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास फटाके जप्त होणार

फटाका उडविण्याच्या ठिकाणापासून चार मीटर अंतरावर १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय ठरवून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या साखळी फटाक्यांच्या वापरावरही बंदी असेल. निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणारे किंवा नियमबाह्य साखळी फटाके आढळून आल्यास ते जप्त करून त्यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

पर्यावरणपूरक दिवाळीसाठी जनजागृतीचे निर्देश

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ध्वनी आणि हवा प्रदूषणाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी शिक्षण संस्थांनी विविध उपक्रम राबवावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. सणांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार किंवा अपघात घडू नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजनांचे नियोजन केले आहे.

नागरिकांनी फटाके वाजवताना पुरेशी काळजी घ्यावी, न्यायालय व प्रशासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे आणि आनंददायी तसेच सुरक्षित दिवाळी साजरी करावी, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी भूषण अहिरे यांनी शेवटी केले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button