अमळनेरात अवैध मुरूम वाहतुकीवर संयुक्त धडक; ९.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त
महसूल व पोलिसांची निसर्डी शिवारात कारवाई; डंपरसह मुरूम ताब्यात

अमळनेरात अवैध मुरूम वाहतुकीवर संयुक्त धडक; ९.५९ लाखांचा मुद्देमाल जप्त
महसूल व पोलिसांची निसर्डी शिवारात कारवाई; डंपरसह मुरूम ताब्यात
अमळनेर | प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील निसर्डी शिवारात सुरू असलेल्या अवैध मुरूम वाहतुकीवर महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई करत मुरूमाने भरलेला डंपर जप्त केला. या कारवाईत डंपर व मुरूम असा एकूण ९ लाख ५९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, संबंधितांविरुद्ध महसूल नियमांनुसार पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
निसर्डी परिसरात विनापरवाना मुरूम उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना मिळाल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि पोलिस विभागाचे संयुक्त पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
कारवाईदरम्यान एमएच-२० ईएल-२३५५ क्रमांकाचा डंपर अवैधरित्या मुरूमाची वाहतूक करताना आढळून आला. वाहनाची तपासणी केली असता मुरूम वाहतुकीसाठी आवश्यक परवानगी किंवा रॉयल्टी पावती सादर करता आली नाही. त्यानंतर डंपरसह मुरूम जप्त करण्यात आला.
ही कारवाई तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात महसूल विभागाचे मंडळ अधिकारी संजय चव्हाण, ग्राममहसूल अधिकारी प्रसाद पाटील तसेच पोलिस विभागाचे सहायक फौजदार फिरोज बागवान, पोलिस हवालदार प्रवीण पारधी आणि प्रवीण पाटील यांचा सहभाग होता.
महसूल प्रशासनाने जप्त मुद्देमाल ताब्यात घेतला असून संबंधितांविरुद्ध महसूल नियमांनुसार पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.





