

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात भाद्रपद शुद्ध दशमी, सोमवार, २१ सप्टेंबर रोजी परम पवित्र श्री मंगळ जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे आयोजित या सोहळ्यानिमित्त पहाटेपासून सुरू झालेल्या ‘मंगल’ महाजागरात हजारो भाविकांनी सहभागी होत श्री मंगळग्रह देवांचे दर्शन घेतले. विविध धार्मिक विधी, आकर्षक पुष्पसजावट, महाप्रसाद आणि भव्य पालखी मिरवणुकीमुळे मंदिर परिसर दिवसभर चैतन्यमय झाला होता.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पंचामृत अभिषेकाने प्रारंभ
श्री मंगळ जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात पहाटे ४ वाजता जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या शुभहस्ते श्री मंगळग्रह देवांच्या मूर्तीवर करण्यात आलेल्या विशेष पंचामृत अभिषेकाने झाली. सकाळी ६ वाजता परंपरेनुसार ध्वजाचे मानकरी योगेश पांडव यांनी परिवारासह वाद्यवृंदाच्या गजरात नवीन ध्वज मंदिरात आणले.
यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, आनंद महाले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, सेवेकरी आणि भाविक उपस्थित होते.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर ध्वजाचे मानकरी पांडव दाम्पत्याचे स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी घुगे यांच्या हस्ते त्यांचे औक्षण करण्यात आले. संबळ वादन आणि भेरीच्या निनादाने परिसरात मंगलमय वातावरण निर्माण झाले.
फुलांनी सजवलेल्या पाळण्यात जन्मोत्सव
सकाळी साडेसहाच्या सुमारास मंदिरात फुलांनी सजवलेल्या आकर्षक पाळण्यात श्री मंगळग्रह देवांचा प्रतीकात्मक जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सामूहिकरीत्या देवांचा पाळणा म्हणण्यात आला. त्यानंतर सकाळी ७ वाजता ध्वजपूजन करून मंदिराच्या कळसावरील आणि मुख्य प्रवेशद्वारावरील जुने ध्वज उतरवून नवीन ध्वजांची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.
माजी सैनिक असलेल्या मंदिराच्या सुरक्षा रक्षकांनी नवीन ध्वजाला मानवंदना दिली. सकाळी ८ वाजता श्री मंगळग्रह देवांची महाआरती करण्यात आली. त्यानंतर सकाळी ८.३० वाजता संभाजीनगर येथील किशोर आणि श्रीकांत या उपाध्याय बंधूंनी देवांना ५६ भोगांचा महाप्रसाद अर्पण केला. यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे उपस्थित होते.
दिवसभर भाविकांनी श्री मंगळग्रह देवांचा पाळणा हलवत दर्शनाचा लाभ घेतला. पुण्यातील वेंकीज कंपनीतर्फे मोतीचूर लाडूंच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. हा प्रसाद वितरणाचा उपक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
श्री मंगळग्रह देवांना ५६ प्रकारच्या फळांचा नैवेद्य
यंदाच्या जन्मोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्री मंगळग्रह देवांना अर्पण करण्यात आलेला ५६ प्रकारच्या देशी-विदेशी फळांचा नैवेद्य. अमळनेर येथील निर्गुण फूल भांडारचे संचालक वाल्मीक पाटील यांनी हा विशेष फळभोग अर्पण केला. यामध्ये आंबा, पपई, जांभूळ, सफरचंद, अननस, डाळिंब, सीताफळ, फणस, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, किवी, ड्रॅगनफ्रूट, ब्ल्यूबेरी, चेरी, एवोकॅडो, लिची यांसह विविध देशी-विदेशी फळांचा समावेश होता.
दरवर्षी श्री मंगळग्रह देवांना विविध खाद्यपदार्थांचा ५६ भोग अर्पण केला जातो. यंदा त्यासोबतच ५६ विविध फळांचा नैवेद्य अर्पण करण्याची नवी परंपरा सुरू करण्यात आली.
देशी-विदेशी फुलांच्या सजावटीने मंदिर उजळले
श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्त मंदिराच्या ओट्यावर सजविण्यात आलेल्या पाळण्याभोवती देशी-विदेशी फुलांची आकर्षक मयूरपंखी सजावट करण्यात आली होती. ऑर्किड, सनफ्लॉवर, जर्बेरा, गुलाब, शेवंती, निशिगंध, लिली, कॅला लिली, झेंडू, ट्युलिप, डॅफोडिल्स, अँथुरियम, चॉकलेट कॉसमॉस यांसह विविध रंगीबेरंगी फुलांचा सजावटीत वापर करण्यात आला होता.
फुलांची मनमोहक आरास आणि सुशोभित पाळणा भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला. मंदिर परिसरातील या सजावटीमुळे जन्मोत्सवाच्या उत्साहात आणखी भर पडली.
जगभरातील भाविकांना ऑनलाइन दर्शन
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे जन्मोत्सवानिमित्त मंदिरात आयोजित सर्व धार्मिक विधींचे सोशल मीडियाच्या माध्यमातून दिवसभर थेट प्रक्षेपण करण्यात आले. मंगल तंत्रज्ञ आशिष चौधरी यांनी या उपक्रमाची जबाबदारी सांभाळली. त्यामुळे देश-विदेशातील भाविकांना घरबसल्या श्री मंगळ जन्मोत्सव सोहळ्याचे दर्शन घेता आले.
महाभोमयाग, पालखी मिरवणूक अन् महाधुपारतीने सांगता
जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दुपारी १ वाजता रेती, शेती आणि मातीशी निगडित समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी श्री महाभोमयागाचे आयोजन करण्यात आले. श्री मंगळग्रह देवांच्या कृपाप्राप्तीसाठी आयोजित या धार्मिक यागात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व त्यांच्या धर्मपत्नी माजी आमदार लताताई सोनवणे, अमळनेरच्या तहसीलदार डॉ. उमाताई ढेकळे, बांधकाम व्यावसायिक प्रवीण नाना पाटील व त्यांच्या धर्मपत्नी कविताताई पाटील तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर व त्यांच्या धर्मपत्नी मंगलाताई बाविस्कर सहभागी झाले. दुपारी साडेचार वाजेपर्यंत हा याग सुरू होता.
सायंकाळी ५ वाजता वाद्यवृंदाच्या गजरात श्री मंगळग्रह देवांची मंदिर परिसरातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता श्री मंगळग्रह देवांची भव्य महाधुपारती करण्यात आली. या धार्मिक विधींनी आणि भक्तिमय वातावरणात श्री मंगळ जन्मोत्सव सोहळ्याची सांगता झाली.







