Big Breaking : अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक
महा पोलीस न्यूज | २१ मार्च २०२४ | दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दोन तास चाललेल्या चौकशी नंतर ईडी (सक्तवसुली संचालनालय) ने त्यांना अटक केली आहे. केजरीवाल यांच्या अटकेने मोठी खळबळ उडाली असून आप समर्थक दिल्लीत केजरीवाल यांच्या घराबाहेर जमत आहे.
दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. ईडीकडून अटक टाळण्यासाठी केजरीवाल यांनी दाखल केलेली याचिका गुरुवारी उच्च न्यायालयात फेटाळण्यात आली. त्यानंतर काही वेळातच ईडीचे पथक १० व्या वेळेस समन्स बजावण्यासाठी केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले. सुमारे दोन तास अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांच्या घराची झडती घेत चौकशी केली.
अरविंद केजरीवाल यांना ईडीने या प्रकरणी यापूर्वी ९ समन्स पाठवले होते, मात्र ते एकदाही ईडीसमोर हजर झाले नाहीत. दरम्यान, केजरीवाल यांची कायदेशीर टीम सुप्रीम कोर्टात पोहोचली असून तिथे हायकोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले जाणार आहे. आज दिल्ली हायकोर्टाने या प्रकरणी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली होती आणि सीएम केजरीवाल यांना अटकेपासून दिलासा मिळत नसल्याचे म्हटले होते. दरम्यान, अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीचे समर्थक दिल्लीत केजरीवाल यांच्या घरासमोर गर्दी करीत आहे.