स्पा सेंटरच्या तपासणीसाठी जळगावातील पोलीस निरीक्षकांना अल्टीमेटम!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात तब्बल १२ स्पा सेंटर सुरू असून त्यात अनेक स्पा सेंटर चालकांकडे आवश्यक परवानग्या नाही. तसेच काही ठिकाणी स्पाच्या नावाखाली अश्लील प्रकार होत असल्याचे वृत्त ‘महा पोलीस न्यूज’ने प्रसिद्ध केले होते. वृत्ताची दखल घेत अपर पोलीस अधिक्षकांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षकांना पत्र पाठवून तपासणीच्या सूचना केल्या आहेत. रविवारपर्यंत तपासणी न केल्यास पुढील कार्यवाही अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते करणार आहेत.
शहरातील अनेक प्रमुख भागांत स्पा आणि मसाज सेंटर सुरू आहेत. सुरुवातीला २-३ असलेल्या स्पा सेंटरची संख्या आज १० च्या पुढे गेली असून त्यात भर पडतच आहे. काही ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली अनैतिक कृत्ये चालू असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. जिल्हा प्रशासन, महापालिका, कामगार आयुक्त आणि पोलिसांकडून या स्पा सेंटरची तपासणी होत नाही त्यामुळे सर्वांचे फावले होत आहे. स्पा सेंटरवर कारवाई करण्याऐवजी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. काही सेंटरमालक प्रशासनातीलच काही कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या आश्रयाने हा अनधिकृत व्यवसाय चालवत असल्याचे बोलले जात आहे.
सोशल मीडियातून जाहिरात, मध्यवर्ती भागात सेंटर
जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात, गोविंदा रिक्षा स्टॉपजवळ, रिंगरोड परिसर, रामानंदनगर, मू.जे.महाविद्यालय रस्ता, मेहरुण उद्यान परिसरात स्पा सेंटर मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. विशेष म्हणजे स्पा सेंटरची माहिती देणारे आकर्षक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केले जात असून विविध ऑफर देत ग्राहकांना आकर्षित केले जाते.
बी-टू-बी, हँड सर्व्हिसच्या नावाने गैरप्रकार
शहरात सुरू असलेल्या स्पा सेंटरमध्ये विविध प्रकारच्या मसाज सेवा पुरवल्या जातात. प्रत्येक मसाजचे दर वेगवेगळे आहेत. काही डोस सेंटरमध्ये सेवेचा दर दिल्यानंतर खोलीत मसाज करताना संबंधित तरुणीकडून वेगळ्याच सेवेचे आमिष दाखवले जाते. बी-टू-बी, शॉवर बाथ, हँड सर्व्हिसच्या नावाने गैरप्रकार देखील केले जातात. संबंधित स्पा मालकांना देखील याबाबत कल्पना असते.
प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या सुचना
अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी जळगाव शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. आपल्या हद्दीत असलेल्या सर्व स्पा सेंटरची तपासणी करून कागदपत्रे व इतर परवानगी घेतली आहे की नाही? याची पडताळणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. रविवारपर्यंत स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी तपासणी करून तसे कळवण्याचे अपर पोलीस अधीक्षक यांनी सांगितले आहे.
..तर प्रभारी अधिकाऱ्यांवर होणार कार्यवाही
जळगावात सुरू असलेल्या सर्व स्पा सेंटरच्या परवानगीची आणि आवश्यक सर्व कागदपत्रांची तपासणी करण्याच्या सूचना प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. निश्चित कालावधीत अहवाल सादर न केल्यास आमच्या पथकाकडून स्पा सेंटरची तपासणी करण्यात येणार आहे. आमच्या तपासणीत काही गैर किंवा नियमबाह्य आढळून आल्यास त्या स्पा सेंटर चालक, मालकासह संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर देखील कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे.