महावितरणच्या अवाजवी वीजबिलांविरोधात अमळनेरमध्ये १७ सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा


महावितरणच्या अवाजवी वीजबिलांविरोधात अमळनेरमध्ये १७ सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा
नवीन मीटरनंतर हजारोंची बिले; सोलर मीटरमधील त्रुटी दूर करण्यासह मीटर सक्ती थांबविण्याची मागणी
अमळनेर | प्रतिनिधी
शहर व परिसरात महावितरणकडून नवीन वीज मीटर बसविल्यानंतर ग्राहकांना अवाजवी आणि फुगवलेली वीजबिले येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या कारभाराची चौकशी करून ग्राहकांना दिलासा द्यावा, अन्यथा १७ सप्टेंबर २०२६ पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या आवारात तीव्र उपोषण सुरू करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.
हे आंदोलन माजी आमदार शिरीषदादा चौधरी तसेच शिवसेना तालुका प्रमुख व नगरसेवक गुलाब बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रविण पुरुषोत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे.
नवीन मीटरनंतर हजारोंची बिले
नवीन मीटर बसविल्यानंतर प्रत्यक्ष वीज वापर कमी असतानाही हजारो रुपयांची बिले ग्राहकांना देण्यात येत असल्याची तक्रार आंदोलनकर्त्यांनी केली आहे. एका पंख्याचा वापर असलेल्या दुकानाला तब्बल २१ हजार रुपयांचे वीजबिल आल्याचा प्रकार निवेदनातून निदर्शनास आणून देण्यात आला. त्यामुळे या बिलिंग प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सोलर बिलिंगमधील त्रुटी दूर करण्याची मागणी
सौरऊर्जा प्रकल्प बसविलेल्या ग्राहकांच्या मीटर रीडिंग तसेच वीज आयात-निर्यात (Import-Export) नोंदीमध्ये त्रुटी असल्याच्या तक्रारीही करण्यात आल्या आहेत. या त्रुटींची तातडीने दुरुस्ती करून ग्राहकांना योग्य बिल आकारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
मीटर बसविण्याची सक्ती थांबवावी
नागरिकांवर नवीन वीज मीटर बसविण्यासाठी केली जाणारी सक्ती तात्काळ थांबवावी, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. अवाजवी वीजबिलांमुळे त्रस्त ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
निवेदनाची दखल; चौकशीचे आदेश
यासंदर्भात निवेदन सादर करताना प्रविण पुरुषोत्तम पाटील, पंकज संतोष शेटे, राहुल कंजर, अमन जाकीर खाटिक, मोहित नितीन पाटील, पंकज अरुण चौधरी, जयेश रविंद्र चव्हाण, भूषण गोपिचंद कोळी, गणेश रमेश जाधव, खंडू सोमाजी कोळी, विजय महाजन, जयेश ठाकरे, अथर्व डेरे, किरण बडगुजर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अंधा पाटील, दिनेश ज्ञानेश्वर पाटील आणि राहुल साहेबराव पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, निवेदनाची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकाऱ्यांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांना या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.







