खळबळ! बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश; गुलाबराव देवकरांना धक्का

खळबळ! बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश; गुलाबराव देवकरांना धक्का
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्ह्याच्या राजकीय आणि सहकार वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ. अरुण पाटील यांनी रविवार, २४ मे रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे. अजित पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. अरुण पाटील यांनी ऐन बाजार समितीच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘कमळ’ हाती घेतल्याने जळगाव ग्रामीणसह जिल्ह्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
हा राजकीय पक्षप्रवेश जामनेर येथे पार पडला. डॉ. अरुण पाटील यांनी दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास जामनेर येथे जाऊन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आणि भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. विशेष म्हणजे, या प्रसंगी जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी नुकतीच बिनविरोध निवड झालेले लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी अण्णा टेलर हे देखील उपस्थित होते. डॉ. अरुण पाटील यांच्या या निर्णयामुळे जळगाव बाजार समितीच्या अंतर्गत राजकारणाला आता एक वेगळीच कलाटणी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागच्या काही काळापासून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात आमदार मंगेश चव्हाण यांनी विशेष लक्ष घातल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता बाजार समितीत भाजपचा प्रभाव आणि वर्चस्व कमालीचे वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यातच देवकर गटाचे खंदे समर्थक मानले जाणारे डॉ. अरुण पाटील आता भाजपवासी झाल्यामुळे बाजार समितीवरील भाजपची पकड अधिक मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघातील म्हसावद गटातही भाजपचे प्राबल्य कमालीचे वाढले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.






