केळी व कापूस उत्पादकांसाठी विशेष ‘खान्देश पॅकेज’ जाहीर करा

केळी व कापूस उत्पादकांसाठी विशेष ‘खान्देश पॅकेज’ जाहीर करा
रोहिणी खडसे यांची शासनाकडे मागणी; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांना पत्र
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे केळी व कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्या मदतीसाठी शासनाने विशेष ‘खान्देश पॅकेज’ जाहीर करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि पालकमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.
रोहिणी खडसे यांनी पत्रात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वादळी वारे, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि उष्णतेच्या लाटांमुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. विशेषतः ५ जून रोजी यावल व रावेर तालुक्यात तसेच ६ जून रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली परिसरात केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वारंवार होणाऱ्या या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांना केवळ पिकांच्या नुकसानीचाच फटका बसत नसून मुलांचे शिक्षण, मुलींचे विवाह, आरोग्य खर्च आणि इतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांवरही त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील प्रमुख नगदी पिके असलेल्या केळी आणि कापसाचे सातत्याने नुकसान होत असल्याने शासनाने विशेष मदत जाहीर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रमुख मागण्या
– केळी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तातडीने विशेष ‘खान्देश पॅकेज’ जाहीर करावे.
– पंचनाम्यानंतर दिली जाणारी तुटपुंजी मदत न देता प्रत्यक्ष नुकसान झालेल्या पिकांच्या बाजारभावानुसार भरपाई द्यावी.
– मागील खरिपातील अतिवृष्टी मदत कोणतीही अट न घालता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.
– पीक विमा योजनेतील जाचक अटी शिथिल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा रक्कम सुलभपणे उपलब्ध करून द्यावी.
– केळी व कापूस पिकांना योग्य आणि हमीभाव मिळण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली आहे.






