भडगाव तालुक्यात ३५ ग्रामपंचायतींसाठी १२ जूनला आरक्षण सोडत; १३१ सदस्यपदांचे भविष्य ठरणार
निवडणूक प्रक्रियेला वेग; आरक्षण सोडतीकडे इच्छुक उमेदवार व नागरिकांचे लक्ष

भडगाव तालुक्यात ३५ ग्रामपंचायतींसाठी १२ जूनला आरक्षण सोडत; १३१ सदस्यपदांचे भविष्य ठरणार
निवडणूक प्रक्रियेला वेग; आरक्षण सोडतीकडे इच्छुक उमेदवार व नागरिकांचे लक्ष
भडगाव, प्रतिनिधी –तालुक्यातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या व सन २०२६ या कालावधीत मुदत संपणार्या एकुण ३५ नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या सार्वञिक निवडणुकांसाठी सदस्य पदाच्या जागांचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केलेला आहे. यात १११ प्रभागांमध्ये तर १३१ सदस्य पदासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम संबंधित ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन दि. १२ रोजी घेण्यात येणार आहे. याबाबत भडगाव तहसिलदार शितल सोलाट यांनी या ग्रामसभांसाठी प्राधिकृत अधिकारी तसेच सहाय्यक अधिकारी, कर्मचार्यांची नियुक्ती केलेली आहे. या अधिकार्यांनी दि. १२ रोजी सकाळी होणार्या व नेमुण दिलेल्या वेळीत आरक्षणाची सोडत काढुन विहीत नमुन्यात अहवाल ५ प्रतित या कार्यालयात सादर कराव्यात. या आशयाचे आदेश ग्रामसभांसाठी नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकार्यांना दिलेले आहेत. भडगाव तहसिल निवडणुक प्रशासन कामाला लागलेले आहे. भडगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आजी, माजी पदाधिकारी, ईच्छुक उमेदवार, राजकीय मंडळी, नागरीकांचे आतापासुनच या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागलेले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कोणत्या प्रभागात सदस्य पदासाठी कोण कोणत्या जागांचे आरक्षण काय निघते? याची उत्सुकता नागरीकांना लागलेली आहे.
भडगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या एकुण ३५ ग्रामपंचायतींवर सध्या प्रशासक राज आहे. शासनाने ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणुन सरपंचांचीच निवड केलेली आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये प्रशासक राज मुळे विकास कामांना खीळ बसल्याची नागरीकात चर्चा आहे. यापुर्वी या ग्रामपंचायतींचे लोकनियुक्त सरपंच पदासाठीचे आरक्षण सोडत काढण्यात आलेली आहे. प्रभाग रचना कार्यक्रम झालेला आहे. आता ग्रामपंचायत सदस्य जागांसाठी आरक्षण सोडत निघणार आहे. एकंदरीत ग्रामपंचायत निवडणुकांबाबत प्रशासनाची यंञणा अलर्ट आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वञिक निवडणुकांचा बोलबाला आता पासुनच सुरु झालेला आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. निवडणुक लढविणार्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी व ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकांसाठी इच्छुकांनी आतापासुनच पायाला घुंगरु बांधलेले आहेत. सदस्य पदाच्या जागांचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचाली गतीमान होणार आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका केव्हा लागतील? याकडे भडगाव तालुक्याच्या नागरीकांचे आतापासुनच लक्ष लागलेले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार , निवडणुक प्रक्रीयेत नागरीकांच्या मागासवर्गाचा ( ओबीसी ) प्रवर्ग ५० टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती भडगाव तहसिल निवडणुक विभागाचे लिपीक एम. एम. कोळी यांनी दै. लोकशाही शी बोलतांना दिली. राजकीय गणिते यामुळे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
सदस्यांचा आरक्षण सोडत कार्यक्रम —
ग्रामपंचायतींच्या सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत कार्यक्रम असा आहे. दि. १२ रोजी विशेष ग्रामसभा प्राधिकृत केलेल्या अध्यक्षतेखाली घेऊन सदस्य पदासाठी आरक्षणाची सोडत काढणे. दि. १७ रोजी प्रभागनिहाय आरक्षण प्रारुप अधिसुचनेची ( नमुना ब) जिल्हाधिकारी यांची मान्यता घेणे. दि. १९ रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करणे. दि. १९ ते दि. २५ पर्यंत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सुचना दाखल करण्याचा कालावधी. दि. १० रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेला ( नमुना अ) व्यापक प्रसिद्धी देणे.असा कार्यक्रम आहे.
भडगाव तालुक्यात आरक्षण सोडत ग्रामपंचायतीचे नाव, कंसात प्रभाग संख्या, सदस्य संख्या पुढील प्रमाणे.
यात वडजी. (५), १३, पिंपरखेड. (४), ११, गिरड. (५),१५, बांबरुड प्र. ऊ. (३),९, बांबरुड प्र. ब. (३), ९, जुवार्डी. (४), ११, आमडदे. (५), १३, कोठली. (३), ९, भोरटेक बुद्रुक. (३), ९, लोण प्र.भ. (३),७, वाक. (३), ९, तांदुळवाडी. (३), ७, पळासखेडे. (३), ९, वडगाव बुद्रुक.(३), ९, वडगाव नालबंदी. (३), ९, सावदे. (३), ९, खेडगाव खुर्द. (३), ९, पांढरद. (३), ७, भट्टगाव. (३), ७, पिंपळगाव बुद्रुक. (३) ९, वलवाडी बुद्रुक. (३), ९, बोदर्डे. (३),९, महिंदळे. (४),११, पिंप्रीहाट. (३), ९, पिचर्डे. (३),९, मळगाव.(३), ७, वाडे. (५),१३,मांडकी. (३), ७, आंचळगाव. (४), ११, बाळद खुर्द. (३),७, बात्सर. (३), ९, वरखेड. (३), ९, शिवणी. (३), ९, घुसर्डी खुर्द. (३),९, बोरनार. (३), ७.अशी आहे.
सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या व सन २०२६ या कालावधीत मुदत संपणार्या नवनिर्मित ३५ ग्रामपंचायतींच्या सार्वञिक निवडणुकांसाठी सदस्यांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दि. १२ रोजी काढण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा होणार आहेत. तसे आदेश संबंधित अधिकार्यांना देण्यात आलेले आहेत.निवडणुक प्रशासनाची यंञणा सुरु आहे.
सुधीर सोनवणे.
निवाशी नायब तहसिलदार ., भडगाव.





