पावसासाठी भगवान झूलेलाल यांना साकडे; जळगावात आज भव्य बहराणा साहिब शोभायात्रा


पावसासाठी भगवान झूलेलाल यांना साकडे; जळगावात आज भव्य बहराणा साहिब शोभायात्रा
फुले मार्केट येथील मरीमाता मंदिरापासून दुपारी ४ वाजता शोभायात्रेला प्रारंभ; रात्री मेहरूण तलावावर विसर्जन
जळगाव | प्रतिनिधी
यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने वरुणदेवता भगवान श्री झूलेलाल यांना प्रसन्न करण्यासाठी जळगावातील पूज्य पंचायत व अमर शहीद संत कंवरराम ट्रस्ट यांच्या वतीने झूलेलाल उत्सव समितीतर्फे शनिवारी, १२ सप्टेंबर रोजी भव्य बहराणा साहिब शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
शोभायात्रेपूर्वी दुपारी ३ वाजता पूजा होणार असून, दुपारी ठीक ४ वाजता फुले मार्केट येथील मरीमाता मंदिरापासून भव्य शोभायात्रेला प्रारंभ होईल. धार्मिक उत्साह आणि भक्तिमय वातावरणात ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करणार आहे.
शोभायात्रा फुले मार्केट येथील मरीमाता मंदिरापासून शास्त्री टॉवर चौक, चित्रा चौक, महालक्ष्मी स्वीट, आर.आर. स्कूल, भगवान झूलेलाल मंदिर, संत कंवरराम चौक, बाबा हरदासराम हाऊसिंग सोसायटीमार्गे कंवर नगर (सिंधी कॉलनी) येथे पोहोचणार आहे.
त्यानंतर रात्री ९ वाजता मेहरूण तलाव येथे बहराणा साहिबचे विसर्जन करण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्यात समाजबांधवांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भगवान झूलेलाल यांचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन झूलेलाल उत्सव समिती, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.






