Crime

भांडे वाटपचा घोळ : केवायसीच्या नावाखाली मागितली १०० रुपयांची लाच, महिला रंगेहाथ!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्र शासनाच्या योजनेंतर्गत घरगुती उपयुक्त संच वाटपाच्या कामात लाच मागणाऱ्या एका महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची कारवाई जळगावात करण्यात आली आहे. या घटनेमुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासन कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या योजनेतून लाभार्थ्यांना घरगुती उपयोगी संच वितरित करण्याचे काम सुरू होते. या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित महिला आसमा परवीन शेख इरफान (वय ३८, खाजगी लोकसेवक) हिने तक्रारदाराकडे केवायसी करण्यासाठी १०० रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यानुसार, आरोपी महिलेला पंचांसमक्ष १०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईदरम्यान एकूण ४७,२५० रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली असून, त्यात विविध नोटांचा समावेश आहे. प्राथमिक तपासात ही रक्कम इतर लाभार्थ्यांकडूनही घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन, जळगाव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणी लाच मागितल्यास त्वरित तक्रार करावी.

संपूर्ण कारवाई पोलीस उप अधिक्षक योगेश ठाकुर, पोलीस निरीक्षक रेश्मा चंद्रकांत अवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरी सुरेश पाटील, हवालदार बाळु मराठे, राकेश दुसाने, प्रदिप पोळ यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button