PoliticsSocial

स्व.अजितदादा हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे दिलदार नेतृत्व :- पालकमंत्री गुलाबराव पाटील

स्व.अजितदादा हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे दिलदार नेतृत्व :- पालकमंत्री गुलाबराव पाटील

पक्षभेद विसरून सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारे लोकनेते अजितदादांच्या आठवणींना पालकमंत्र्यांनी दिला उजाळा

जळगाव, : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे स्पष्टवक्ते, निर्णयक्षम आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. स्वभावाने कणखर असले तरी त्यांचे मन सर्वसामान्यांसाठी नेहमीच हळवे होते. पक्ष कोणताही असो, सामान्य माणसाचा प्रश्न समोर आला की मदतीचा हात पुढे करण्यात त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. अशा दिलदार आणि लोकाभिमुख नेतृत्वाचे जाणे ही महाराष्ट्राची मोठी हानी आहे. अजितदादांनी आपल्या कर्तृत्वातून जनतेच्या मनात निर्माण केलेले स्थान कायम स्मरणात राहील. त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी पाडळसे धरणाला त्यांचे नाव देण्यासाठी प्रयत्नशील राहील अशा भावना राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केल्या.*

जळगाव येथील रिंग रोडवरील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत दिवंगत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित मुख्य समारंभात पालकमंत्री पाटील बोलत होते.

*अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना पालकमंत्री भावुक*
अजितदादांसोबतच्या आठवणी सांगताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, अजितदादा अर्थमंत्री असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ४७ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली. सामान्य माणसाच्या कामाला न्याय देण्याची त्यांची कार्यपद्धती होती. काम करताना शिस्त, निर्णय घेताना ठामपणा आणि माणसांशी वागताना आपुलकी, ही त्यांच्या नेतृत्वाची खरी ओळख होती. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी केलेली कामे आणि त्यांच्या आठवणी कायम सोबत राहतील. जिल्हा बँकेच्या आवारात स्व.अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्यांच्या कार्याचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी बँकेच्या संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

*सहकार क्षेत्रासाठी अजितदादांचे योगदान प्रेरणादायी – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील*
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले की, अजितदादा पवार यांना सहकार, शेती, दुग्धव्यवसाय आणि उद्योग क्षेत्राची सखोल जाण होती. अडचणीतील सहकारी संस्थांना मदत करून त्यांनी सहकार चळवळीला बळ असून सहकार क्षेत्रातील त्यांचे योगदान प्रेरणादायी आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या सुमारे ४,५०० कोटी रुपयांच्या ठेवी आणि २३२ शाखांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. अजितदादांचा पुतळा बँकेच्या संचालकांसह कर्मचारी आणि भावी पिढीला सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

*कठोर निर्णय घेणारे, पण कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व – वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे*
वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे म्हणाले की, अजितदादा हे शिस्तप्रिय आणि कठोर निर्णय घेणारे नेतृत्व होते. वित्त व नियोजन विभागाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी आर्थिक शिस्तीला विशेष महत्त्व दिले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या विकासासाठी निर्णय घेण्याची त्यांची भूमिका होती. कार्यकर्त्यांना शिस्त लावताना त्यांच्या योग्य कामांसाठी ते सदैव मदतीला उभे राहत. जिल्ह्यातील अनेक विकासकामांना त्यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली. त्यांच्या कार्याची आठवण हा पुतळा सदैव करून देत राहील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अनिल पाटील, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन आणि माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन यांनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या. बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी बँकेच्या कार्याचा आढावा घेत अजितदादांच्या सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल अनुभव सांगितले. बँकेचे उपाध्यक्ष तथा आमदार अमोल पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजित दादा पवार यांच्या कार्यावर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. लोकनेते अजित दादा पवार यांचे कार्य पुस्तिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

*या मान्यवरांची उपस्थिती*
या सोहळ्यास सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार अनिल पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, महापौर दीपमाला काळे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतीश पाटील, माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष आमदार अमोल पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, माजी महापौर विष्णू भंगाळे, जयश्री महाजन, रवींद्र भैय्या पाटील, रोहित निकम, प्रतिभा शिंदे यांच्यासह बँकेचे सर्व संचालक, जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा बँकेच्या मुख्य इमारतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या तैलचित्राचे अनावरण सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी तर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी आभार मानले. या सोहळ्याला जिल्हा बँकेचे सभासद, सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
***********

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button