भाजप महिला मोर्चाकडून पोलीस अधिक्षकांचा सन्मान, जाणून घ्या कारण..

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून महिलांना व सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास रोखण्यासाठी जळगाव पोलिसांनी सुरू केलेल्या विशेष मोहिमेचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, जळगाव महानगर जिल्हाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत पोलिसांच्या धडक कारवाईबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष नितू परदेशी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील वाईन शॉपसमोरील ओटे, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यांच्या कडेला तसेच वाहनांमध्ये बसून मद्यपान करणाऱ्या तळीरामांविरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करून कायदा व सुव्यवस्थेबाबत सकारात्मक संदेश दिला आहे.
विशेषतः महिलांना बाजारपेठ, भाजीपाला मार्केट तसेच गर्दीच्या भागात वावरताना अशा प्रकारांमुळे मानसिक त्रास व असुरक्षिततेची भावना निर्माण होत होती. पोलिसांनी स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई केल्याने महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, टवाळखोरी आणि लिंक अँड ड्राईव्हसारख्या प्रकारांवर पोलिसांनी घेतलेली भूमिका कौतुकास्पद असून, या मोहिमेमुळे गुन्हेगारीवरही निश्चितच आळा बसेल, असा विश्वास महिला मोर्चाने व्यक्त केला आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत ठेवत महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी अशी मोहीम पुढेही सातत्याने सुरू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त करत भाजप महिला मोर्चाने संपूर्ण पोलीस प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष नितू परदेशी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, रेखा वर्मा, संगीता पाटील, ज्योती पालीवाल, नंदिनी दर्जी आदी उपस्थित होत्या.






