Other

धुळे पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

धुळे पंचायत समितीतील तांत्रिक सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

विहीर अनुदानाची फाईल पुढे सरकवण्यासाठी ७ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

धुळे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीच्या अनुदानाची उर्वरित रक्कम मंजूर करून देण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पंचायत समिती धुळे येथील तांत्रिक सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पंचायत समिती वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील आरोपी विश्वजित संजय भामरे (वय ३१) हे पंचायत समिती धुळे येथे तांत्रिक सहाय्यक म्हणून कार्यरत असून त्यांच्याविरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ व ७-अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांच्या भावजयच्या नावावर मौजे नंदाळे बु. येथे शेतजमीन असून त्या जमिनीत महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०२३-२४ मध्ये विहीर खोदकामासाठी ३ लाख ९९ हजार ६१० रुपयांचे अनुदान मंजूर झाले होते. त्यापैकी २ लाख ३९ हजार रुपये यापूर्वी अदा करण्यात आले होते. विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनुदानाची रक्कम मिळावी यासाठी तक्रारदार पंचायत समितीकडे पाठपुरावा करत होते.

दि. ५ मे रोजी तक्रारदारांनी पंचायत समिती कार्यालयात जाऊन तांत्रिक सहाय्यक विश्वजित भामरे यांची भेट घेतली असता, विहिरीची मोजमाप पुस्तिका तपासणीसाठी पुढे पाठविणे आणि शाखा अभियंता तसेच उपअभियंता यांच्या कामासाठी ७ हजार रुपयांची लाच मागण्यात आली. त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे तक्रार दाखल केली.

दि. १२ मे रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता आरोपीने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. सापळा कारवाईदरम्यान आरोपी विश्वजित भामरे यांनी तक्रारदारांकडून ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल आणि त्यांच्या पथकाने केली. या कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कामासाठी लाचेची मागणी होत असल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button