Other

चाळीसगाव दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक; एलसीबीची कारवाई

चाळीसगावात दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक; एलसीबीची कारवाई

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहरातील मोटारसायकल चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत चोरीस गेलेली दुचाकीसह एकूण ८० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. तसेच स्वतंत्र कारवाईत एका संशयिताकडून २५ हजार रुपये किमतीची विनानंबर प्लेटची दुचाकी जप्त करण्यात आली.

चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान चोरीस गेलेली एचएफ डिलक्स मोटारसायकल राहुल सुभाष भिसे (रा. हनुमानसिंग नगर, चाळीसगाव) याने चोरल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार राहुल भिसे याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.

चौकशीदरम्यान त्याच्याकडून होंडा युनिकॉर्न मोटारसायकल हस्तगत करण्यात आली. अधिक तपासात त्याने चोरीची एचएफ डिलक्स मोटारसायकल प्रशांत दीपक राजपूत (रा. हरीगिरी बाबा नगर, पाटणादेवी रोड, चाळीसगाव) याला विकल्याची कबुली दिली. त्यानुसार प्रशांत राजपूत यालाही ताब्यात घेण्यात आले. चौकशीत राहुल भिसे याने सदर मोटारसायकल २० हजार रुपयांना विकल्याचे उघड झाले. वाहनाचे कागदपत्र मागितल्यावर ते नंतर देतो असे सांगून राहुल भिसे टाळाटाळ करीत असल्याचेही समोर आले.

या प्रकरणात दोन्ही आरोपींकडून चोरीस गेलेल्या दुचाकीसह एकूण ८० हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

विनानंबर दुचाकीसह संशयित ताब्यात

दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हेगार शोध व पेट्रोलिंग करीत असताना अहिल्याबाई होळकर चौक परिसरात एक इसम विनानंबर प्लेटची मोटारसायकल घेऊन संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्यास थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रशांत दत्तात्रय राठोड (वय २७, रा. यशवंतनगर रोड, चाळीसगाव) असे सांगितले. मात्र, मोटारसायकलबाबत समाधानकारक माहिती देता न आल्याने त्याच्याकडील २५ हजार रुपये किमतीची यामाहा एफझेड मोटारसायकल जप्त करण्यात आली. पुढील चौकशीसाठी संशयित व दुचाकी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली आहे.

पथकाची उल्लेखनीय कामगिरी

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरबाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील व भूषण पाटील यांचा समावेश होता.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button