Other

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला अमळनेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला अमळनेरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेर (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’ अंतर्गत अमळनेर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी शनिवारी (दि. 25) इंदिरा भवन येथे भव्य समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. या शिबिरात विविध शासकीय विभागांनी एकाच छताखाली नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करून विविध योजनांचा लाभ वितरित केला.

शिबिराला माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तहसीलदार उल्हास देवरे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, गटविकास अधिकारी नरेंद्र पाटील, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

एकाच ठिकाणी विविध योजनांचा लाभ

महसूल, पुरवठा, वन, पंचायत समिती, नगरपरिषद, पोलिस, महिला व बालविकास, महावितरण, कृषी, आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन, परिवहन आदी विभागांनी स्वतंत्र स्टॉल उभारून नागरिकांना सेवा दिली. लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे, प्रमाणपत्रे, धनादेश, शालेय साहित्य, शिष्यवृत्ती, रेशनकार्ड, घरकुल अनुदान, मोबाईल परतावा, रोपे, वैद्यकीय योजनांचा लाभ तसेच विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले.

20 हजारांहून अधिक लाभांचे वितरण

शिबिरामध्ये विविध विभागांच्या 20,680 प्रकरणांमधून एकूण 20,929 लाभांचे वितरण करण्यात आले. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य, लेक लाडकी योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, उमेद महिला बचत गट कर्ज, सौर ऊर्जा योजना, कृषी योजना, आरोग्य योजना, शालेय साहित्य व शिष्यवृत्ती वितरण यांचा समावेश होता.

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिबिरात अंदाजे 2,800 ते 3,000 नागरिकांनी उपस्थिती लावून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील व वसुंधरा लांडगे यांनी केले. शेवटी तहसीलदार उल्हास देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button