धुळे जिल्ह्यात 5,385 किलो मावा जप्त; भेसळीच्या संशयावरून 16.52 लाखांचा साठा ताब्यात


धुळे जिल्ह्यात 5,385 किलो मावा जप्त; भेसळीच्या संशयावरून 16.52 लाखांचा साठा ताब्यात
अहमदाबादहून अकोल्याकडे जाणाऱ्या लक्झरी बसवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 13 विविध कंपन्यांच्या माव्याचे नमुने प्रयोगशाळेत
धुळे | प्रतिनिधी
‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार धुळे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाकडून विविध वाहनांची तपासणी सुरू आहे. या मोहिमेदरम्यान अहमदाबादहून अकोल्याकडे जाणाऱ्या लक्झरी बसमधून वाहतूक करण्यात येत असलेला तब्बल 5 हजार 385 किलो मावा (खवा) भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत 16 लाख 52 हजार 100 रुपये आहे.
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, अहमदाबादहून अकोल्याकडे अशोक लेलँड कंपनीच्या वेलकम लक्झरी बस क्रमांक MP-44-ZF-7214 मधून मिठाई तयार करण्यासाठी लागणाऱ्या माव्याची वाहतूक होणार होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तसेच धुळे तालुका पोलिसांनी सकाळी सुमारे 6 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील मोराणे हद्दीत साक्री रोडवरील हॉटेल बालाजीजवळ बस थांबवून तपासणी केली.
तपासणीदरम्यान बसमध्ये विविध कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात मावा आढळून आला. पुढील कारवाईसाठी संबंधित वाहन टोलनाक्याजवळील दिसान कोल्ड स्टोरेज येथे नेण्यात आले. तेथे माव्याच्या साठ्याची तपासणी करण्यात आली.
या कारवाईत 13 विविध कंपन्यांच्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. यामध्ये प्रीमियम हलवा (ब्रजनिधी), प्रीमियम हलवा (गणेशा), इंडियन स्वीट हलवा (नंदि), स्वीट हलवा (खोडलं), हलवा (श्री ग्वाल), हलवा (श्री गोकुळ), स्वीट हलवा (गोपाल), ट्रॅडिशनल स्वीट (श्री ग्वाल), ट्रॅडिशनल स्वीट (श्री गोकुळ), इंडियन स्वीट (श्री गोपाल), कृष्णा हलवा, इंडियन डेझल्ट (नंदि) आणि प्रीमियम डेझल्ट (मीरा) या उत्पादनांचा समावेश आहे.
भेसळीचा संशय असल्याने एकूण 5,385 किलो वजनाचा आणि 16 लाख 52 हजार 100 रुपये किमतीचा साठा जप्त करून कोल्ड स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे. संबंधित माव्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
या प्रकरणात बसचालक जगदीश मानजी पाटीदार, महेंद्रसिंग परबतसिंग राठोड आणि क्लिनर राजकुमार रोशनलाल आचार्य, तिघेही रा. अहमदाबाद (गुजरात), यांची माहिती घेण्यात आली आहे.
ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त मंगेश माने (नाशिक), सहाय्यक आयुक्त (अन्न) गो. वी. माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार, अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांनी केली. कारवाईस धुळे तालुका पोलिस ठाण्याचे PSI खाकीदा सय्यद, सतीश कोठावदे आणि पंकज पाटील यांनी सहकार्य केले.







