Other

बालमजुरीविरोधात जळगाव पोलिसांची विशेष मोहीम; दोन गुन्ह्यांची नोंद

बालमजुरीविरोधात जळगाव पोलिसांची विशेष मोहीम; दोन गुन्ह्यांची नोंद

जळगाव | प्रतिनिधी

१२ जून हा “जागतिक बालमजुरी विरोधी दिन” म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाने ८ जूनपासून बालमजुरी निर्मूलनासाठी स्वतःहून विशेष, नियोजनबद्ध आणि परिणामकारक मोहीम हाती घेतली आहे.

बालमजुरी ही केवळ कायद्याचे उल्लंघन नसून बालकांच्या शिक्षण, आरोग्य, विकास आणि सन्मानाने जगण्याच्या मूलभूत अधिकारांवर होणारा गंभीर आघात असल्याचे स्पष्ट करत पोलिसांनी या विरोधात व्यापक स्तरावर शोध व बचाव मोहीम राबविली आहे.

या मोहिमेंतर्गत हॉटेल्स, ढाबे, गॅरेज, कारखाने, स्क्रॅप युनिट्स, वीटभट्ट्या, रोडसाईड स्टॉल्स, बांधकाम साईट्स, धोकादायक उद्योग, डम्पिंग ग्राउंड, केमिकल युनिट्स तसेच इतर संभाव्य ठिकाणी सिव्हिल ड्रेसमधील पथके, महिला अधिकारी, चाईल्ड वेल्फेअर अधिकारी, महिला पंच व मानव तस्करी विरोधी कक्षाचे (AHTU) पथकांकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे.

कायद्यानुसार १४ वर्षांखालील बालकांना कोणत्याही प्रकारच्या कामात रोजगार देणे पूर्णतः प्रतिबंधित आहे, तर १४ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योगांमध्ये कामावर ठेवण्यास बंदी आहे. यासंदर्भात जुवेनाइल जस्टिस कायदा २०१५ व बालकामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ अंतर्गत कारवाई केली जात आहे.

या विशेष मोहिमेला यश मिळाले असून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दाखल गुन्हे

गुन्हा क्रमांक १७६/२०२६
आरोपी : अरबाज अजीज खाटीक
आरोप : अल्पवयीन बालकास गॅरेजमध्ये धोकादायक काम देऊन बालमजुरी करून घेतल्याचा गुन्हा
कलमे : BNS 146, बालकामगार अधिनियम कलम 3, जुवेनाइल जस्टिस कायदा कलम 79

गुन्हा क्रमांक १७७/२०२६
आरोपी : भगवान पाटील
आरोप : बालकास गॅरेजमध्ये धोकादायक कामावर ठेवून बालमजुरी केल्याचा गुन्हा
कलमे : BNS 146, बालकामगार अधिनियम कलम 3, जुवेनाइल जस्टिस कायदा कलम 79

या मोहिमेमुळे बालमजुरीविरोधातील कारवाई अधिक तीव्र झाली असून जिल्ह्यात सतर्कता वाढली आहे.

दरम्यान, समाजातील प्रत्येक नागरिकाने बालमजुरीबाबत माहिती मिळाल्यास त्वरित पोलीस, बाल हेल्पलाईन १०९८ किंवा संबंधित यंत्रणांना कळवावे, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस दलाने केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button