भडगावात महिलेवर जीवघेणा हल्ला, गंभीर जखमी महिलेवर जळगावमध्ये उपचार, संशयित ताब्यात

भडगावात महिलेवर जीवघेणा हल्ला, गंभीर जखमी महिलेवर जळगावमध्ये उपचार, संशयित ताब्यात
भडगाव( प्रतिनिधी
भडगाव शहरातील महिलेवर झालेल्या गंभीर हल्ला प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत गुन्ह्यातील फरार आरोपी आस्लम बिस्मिल्लाह शेख (रा. यशवंत नगर, भडगाव) यास शोध घेऊन ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणातील आणखी एका महिला संशयितास चाळीसगाव येथून ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
प्राथमिक माहितीनुसार, दि. १२ जून २०२६ रोजी रात्री घडलेल्या या घटनेत एका महिलेवर गंभीर स्वरूपाचा हल्ला झाल्याचा आरोप असून या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न यासह इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेत जखमी झालेल्या महिलेवर सध्या जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती वैद्यकीय देखरेखीखाली असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व जखमी महिला यांच्यात पूर्वीपासून काही कारणांवरून वाद असल्याची प्राथमिक माहिती असून त्यातूनच ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तथापि, घटनेमागील नेमके कारण, हल्ल्याचे स्वरूप आणि संबंधितांची भूमिका याबाबतचा अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशान्वये विशेष तपास पथक कार्यरत आहे. या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, पोलीस निरीक्षक राहुल पाटील तसेच पोउनि सुशिल सोनवने इतर अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे.
दरम्यान, घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील तपासाअंती अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.





