घरफोडीचा गुन्हा उघड; एमआयडीसी पोलिसांकडून तीन आरोपी जेरबंद
चोरीतील चांदीचे देव व इतर मुद्देमालासह २३ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत

घरफोडीचा गुन्हा उघड; एमआयडीसी पोलिसांकडून तीन आरोपी जेरबंद
चोरीतील चांदीचे देव व इतर मुद्देमालासह २३ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत
जळगाव (प्रतिनिधी) : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू नगर परिसरात बंद घरात झालेल्या घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणला असून या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चोरीतील सुमारे २३ हजार रुपये किमतीचे चांदीचे देव तसेच इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेहरू नगर येथे राहणारे फिर्यादी गोविंद रामदास पाटील हे पत्नीसमवेत नातेवाईकांच्या अपघातामुळे त्यांना भेटण्यासाठी दि. ८ जून २०२६ रोजी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. दि. १० जून रोजी शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती फोनद्वारे दिल्यानंतर ते जळगावला परतले. त्यावेळी घरात घरफोडी होऊन चांदीचे देव व इतर संसारोपयोगी वस्तू चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस क्र. ५५८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोहेकॉ किरण चौधरी, नितीन ठाकूर, किरण पाटील, राहुल घेटे, रमाकांत साळुंखे, शशिकांत मराठे आणि योगेश घुगे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला.
दि. २१ जून २०२६ रोजी तांबापुरा परिसरात सापळा रचून संशयित आरोपी शाहरुख शहा सिकंदर शहा (वय २४, रा. पंचशील नगर, तांबापुरा), मुकेश राजू परमार (वय २२, रा. गौतम नगर, तांबापुरा) आणि दीपक राजू पाटील (वय २४, रा. पंचशील नगर, तांबापुरा) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी घरफोडीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
आरोपींकडून १५ हजार रुपये किमतीचे ६ चांदीचे देव, ३ हजार रुपये किमतीची एचपी कंपनीची गॅस हंडी तसेच ५ हजार रुपये किमतीची तांबे व पितळी भांडी असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ किरण चौधरी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.






