अमळनेर पोलिसांची पहाटे धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारे ६ ट्रॅक्टर जप्त

अमळनेर पोलिसांची पहाटे धडक कारवाई; अवैध वाळू वाहतूक करणारे ६ ट्रॅक्टर जप्त
बोरी नदीपात्रात छापा; सहा चालक ताब्यात, मूळ मालकांचा शोध सुरू
अमळनेर | पंकज शेटे: अमळनेर पोलिसांनी अवैध गौणखनिज (वाळू) चोरी व वाहतुकीविरोधात पहाटे धडक कारवाई करत बोरी नदीपात्रातून वाळूची अवैधरित्या वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त केले. या कारवाईत सहा चालकांना ताब्यात घेण्यात आले असून ट्रॅक्टरच्या मूळ मालकांचा शोध सुरू आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते यांनी अवैध गौणखनिज चोरीविरोधात कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने मंगळवारी (२८ जुलै) पहाटे १ ते ५ वाजेदरम्यान ही मोहीम राबविली.
कारवाईदरम्यान अमळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगोणे गावाजवळील बोरी नदीपात्रात पाच विना क्रमांकाचे ट्रॅक्टर-ट्रॉली आणि MH-19 CJ-0775 क्रमांकाचा एक ट्रॅक्टर-ट्रॉली असे एकूण सहा ट्रॅक्टर विनापरवाना वाळूची वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी सर्व वाहने ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केली.
या कारवाईत योगेश नामदेव भोई (रा. रुबजीनगर, अमळनेर), प्रविण सुधाकर सोनवणे (रा. हिंगोणे खुर्द), राहुल छोटू ठाकरे (रा. रुबजीनगर), अर्जुन अशोक मालचे (रा. हिंगोणे खुर्द), सतीश मोहन बावीस्कर (रा. हिंगोणे खुर्द) आणि सोमनाथ मधुकर मोरे (रा. रुबजीनगर) या सहा चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांकडून चालकांवर तसेच संबंधित वाहनांबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ट्रॅक्टरच्या मूळ मालकांचा शोध घेतला जात आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी सांगितले की, अमळनेर तालुक्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही सातत्याने कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.






