घोडसगाव-चिखली सीमेवर अश्लील कृत्ये ; १३ पुरुषांसह १० महिलांना घेतले ताब्यात

घोडसगाव-चिखली सीमेवर अश्लील कृत्ये ; १३ पुरुषांसह १० महिलांना घेतले ताब्यात
एलसीबीच्या पथकाची कारवाई
जळगाव: मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव-चिखली गावांच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या काही हॉटेलच्या मागील भागात तसेच शेतामध्ये अश्लील कृत्ये करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने धडक कारवाई केली आहे. या गुप्त मोहिमेदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून १३ पुरुष आणि १० महिला अशा एकूण २३ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सीमावर्ती भागात काही महिला व पुरुष सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर व अश्लील कृत्ये करत असल्याची गोपनीय माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अचानक छापा टाकून सर्व संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस चौकशीदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व १० महिला या राजस्थान राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या कारवाईत अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (पीटा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मानवी तस्करी, जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणे, कुंटणखाना चालवणे किंवा व्यावसायिक स्वरूपात अनैतिक कृत्य चालवल्याचे कोणतेही थेट पुरावे प्राथमिक तपासात आढळून आले नाहीत. त्यामुळे सध्या उपलब्ध माहिती आणि पुराव्यांच्या आधारे मुंबई पोलीस कायदा कलम ११० व ११७ अन्वयेच कारवाई करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित महिला व पुरुष त्या निर्जनस्थळी नेमक्या कोणत्या कारणासाठी एकत्र आले होते आणि यामागे काही संघटित रॅकेट किंवा इतर बेकायदेशीर प्रकार कार्यरत आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. तपासादरम्यान काही नवीन आणि गंभीर बाबी समोर आल्यास त्यानुसार पुढील अतिरिक्त कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.







