ब्रेकिंग : जिल्हा कारागृहात कैद्याचा धुडगूस, पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एका बंदिवान कैद्याने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी सुमारे ११.१५ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कार्यरत असलेले कर्मचारी मोटे हे नियमित कर्तव्य बजावत असताना एका बंदिवान कैद्याशी त्यांचा वाद झाला. यावेळी संतापलेल्या कैद्याने शिवीगाळ करत मोटे यांच्यावर हल्ला करून मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर कारागृह प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी कर्मचारी मोटे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अंमली पदार्थ बाळगल्याच्या गुन्ह्यात कारागृहात असलेला नन्नवरे नामक बंदिवान कैदी या मारहाणीप्रकरणी संशयित असल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित कैद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पुढील तपास जिल्हापेठ पोलीस करीत आहेत.





