CrimeDetection

रामेश्वर कॉलनीतील घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघडकीस; दोन आरोपी जेरबंद

३१ लाख २६ हजार ८०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

रामेश्वर कॉलनीतील घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघडकीस; दोन आरोपी जेरबंद

३१ लाख २६ हजार ८०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामेश्वर कॉलनी येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उघडकीस आणला. या प्रकरणी दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले ३१ लाख २६ हजार ८०० रुपये किमतीचे २०८ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २८ ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

कुटुंब उज्जैनला दर्शनासाठी गेले असताना घरफोडी
रामेश्वर कॉलनी, जळगाव येथील फिर्यादी संगीता घुगे या कुटुंबासह उज्जैन, मध्य प्रदेश येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. २७ ऑगस्ट रोजी रात्री ३.३० ते २८ ऑगस्ट रोजी रात्री ३.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाज्याची कडी-कॉयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेण्यात आली. घुगे कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९७/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(ए), ३३१(३) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

सीसीटीव्ही, तांत्रिक तपासातून आरोपींचा शोध
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांना आरोपींचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून महत्त्वाचे पुरावे संकलित केले. तसेच तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला.या तपासातून विशाल मुरलीधर दाभाडे (वय २५, व्यवसाय मजुरी) आणि जितेंद्र मुरलीधर दाभाडे (वय २७), दोघेही रा. सप्तश्रृंगी माता मंदिराजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव, यांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत गुन्ह्याची कबुली; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
पोलिसांनी आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी घरफोडीतील चोरीबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून सोन्याचे विविध दागिने आणि चांदीचे जोडवे असा मोठ्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.हस्तगत मुद्देमालामध्ये सोन्याचे गंठन, मिनी पाटली, फॅन्सी शॉर्ट पाटली, काळेमणी पाटली, टॉप्स, विविध डिझाइनच्या अंगठ्या, नथ तसेच चांदीचे जोडवे यांचा समावेश आहे.एकूण ३१ लाख २६ हजार ८०० रुपये किमतीचे २०८ ग्रॅम सोने व २८ ग्रॅम चांदी पोलिसांनी हस्तगत केली आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षकश्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि जळगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी, किरण चौधरी, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, तसेच पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत साळुंखे, नितीन ठाकूर, राहुल घेटे, गणेश टेकर, किरण पाटील, शशिकांत मराठ, ललित नारखेडे, विशाल कोळी, योगी घुगे आणि सुभाष साबळे यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button