Crime

१५ हजार फायद्याच्या आमिषाने सराफ व्यावसायिकाला १८ लाखांचा चुना, तरुणाविरुद्ध गुन्हा

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । गोल्ड लोनवर तारण ठेवलेले सोने सोडवून ते मोडण्यासाठी देण्याचे आमिष दाखवत एका सराफा व्यावसायिकाची तब्बल १८ लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा प्रकार जळगाव शहरात समोर आला आहे. याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कृष्णा भगवान शिंदे हे जळगाव शहरातील जोशीपेठ परिसरात सराफा व्यवसाय करतात. जोशीपेठेतील कालभैरव मंदिराजवळ “ओम ज्वेलर्स” नावाने त्यांचे सराफा व्यवसायचे दुकान आहे. तक्रारीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी ओम महाजन याची त्यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर ४ जून रोजी ओम महाजन याने फोन करून बजाज फायनान्समध्ये तारण ठेवलेल्या १९८ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांवर १९ लाख रुपयांचे गोल्ड लोन असल्याचे सांगितले. ते सोडवून दागिने मोडायचे असल्याने पैसे देण्याची विनंती त्याने केली.

ओम महाजन याने तत्कालीन बँक व्यवस्थापक सुरेंद्र खंडेलवाल यांचे नाव सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर दागिन्यांचे फोटो पाठवत व्यवहारासाठी संपर्क वाढवला. ५ जून रोजी तो शिंदे यांच्या दुकानात आला आणि तातडीने १९ लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. यावेळी सोने कारागीर चेतन दुसाने यांच्या माध्यमातून शेजारील सराफा व्यावसायिक यांच्याकडून तात्पुरती १९ लाख रुपयांची व्यवस्था करण्यात आली.

६ जून रोजी शिंदे, चेतन दुसाने आणि ओम महाजन यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत जाऊन १९ लाख रुपये ओम महाजनच्या खात्यात जमा केले. त्यानंतर त्याने ही रक्कम गोल्ड लोन खात्यात वर्ग केल्याचे सांगितले. मात्र तांत्रिक अडचणी, केवायसी नसणे, खाते सीझ होणे अशा विविध कारणांचा आधार घेत व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही. यानंतर कोटक महिंद्रा बँकेत जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तरीही पैसे परत मिळाले नाहीत. दरम्यान, ओम महाजन याने वेळकाढूपणा करत सोमवारी किंवा मंगळवारी रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले.

८ जून रोजी ओम महाजन याने शिंदे यांच्या खात्यात ९९ हजार रुपये ऑनलाइन जमा केले. त्यानंतर उर्वरित रक्कम देण्याबाबत वारंवार आश्वासने देत राहिला. मात्र पुढे त्याने फोन उचलणे बंद केले. फसवणुकीची शंका आल्याने शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ओम महाजनचे वडील तथा फळबाजार मार्केट कमिटीचे अध्यक्ष संजय महाजन यांची भेट घेतली. त्यांनी मुलगा घरी नसून गायब असल्याचे सांगत त्याची चौकशी करण्याचे आश्वासन दिले.

अखेर ओम महाजन याने ना दागिने दिले, ना संपूर्ण रक्कम परत केली. त्यामुळे आपली १८ लाख १ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर कृष्णा शिंदे यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ओम महाजन याने सराफ बाजारातील आणखी इतर ३ ते ४ सराफा व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक केल्याची चर्चा सुरु आहे, परंतु तक्रार देण्यासाठी अद्यापर्यन्त कुठल्याही सराफा व्यावसायिक तक्रार देण्यासाठी पुढे आलेला नाही. तपासादरम्यान आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button