जळगाव जिल्ह्यात ‘ऑपरेशन ऑल आउट’चा धडाका; २० लाखांची गावठी दारू नष्ट
१२४ गुन्हे दाखल; ४२ हरविलेले मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत, वाहतूक नियमभंगातून ११.६९ लाखांचा दंड

जळगाव जिल्ह्यात ‘ऑपरेशन ऑल आउट’चा धडाका; २० लाखांची गावठी दारू नष्ट
१२४ गुन्हे दाखल; ४२ हरविलेले मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत, वाहतूक नियमभंगातून ११.६९ लाखांचा दंड
महा पोलीस न्यूज I चेतन वाणी I जिल्ह्यातील अवैध धंदे, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटकांविरुद्ध जळगाव जिल्हा पोलीस दलाने एकाच दिवशी व्यापक मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली १६ नोव्हेंबर रोजी पहाटेपासून ‘ऑपरेशन ऑल आउट’ अंतर्गत जिल्हाभरात विशेष पथके तैनात करण्यात आली. या मोहिमेत गावठी हातभट्टी दारूविरोधात १२४ गुन्हे दाखल करून २० लाख ६७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच वाहतूक नियमभंगाच्या कारवायांतून ११ लाख ६९ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
अवैध दारूविक्रीवर मोठी कारवाई
जिल्ह्यात गावठी हातभट्टी दारूची निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध १२४ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत १२० आरोपी निष्पन्न झाले. पोलिसांनी ५ हजार ७२५ लिटर गावठी दारू जप्त करून नष्ट केली. तसेच दारूनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे २८ हजार ९७२ लिटर रसायन जप्त अथवा नष्ट करण्यात आले. या कारवाईतील मुद्देमालाची किंमत २० लाख ६७ हजार २०० रुपये आहे.
देशी-विदेशी दारूच्या अवैध विक्रीप्रकरणी आणखी १२ गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये १२ आरोपींवर कारवाई करून देशी दारूच्या ४२० आणि विदेशी दारूच्या २५ बाटल्या जप्त करण्यात आल्या. या मुद्देमालाची किंमत ६१ हजार ८०५ रुपये आहे.
जुगार, शस्त्रे आणि गांजाविरोधात कारवाई
जुगार कायद्यान्वये ४६ गुन्हे दाखल करून ६० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणांमध्ये ९१ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शस्त्र अधिनियमान्वये दोन गुन्हे दाखल करून दोन आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, दोन तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत ११ गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी १० प्रकरणे अंमली पदार्थ सेवनाशी संबंधित आहेत. एकूण ११ आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, ३ किलो २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत १ लाख ६२ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दणका
वाहतूक शाखा आणि स्थानिक पोलिसांनी मोटार वाहन कायद्यान्वये जिल्हाभरात विशेष तपासणी केली. मद्यप्राशन करून वाहन चालविण्याच्या ८७ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. धोकादायक वाहन चालविण्याच्या कलम १८४ अंतर्गत सहा, कलम ६६/१९२ अंतर्गत ६३, विना हेल्मेट वाहन चालविण्याच्या १३३ आणि महामार्गावर अनधिकृत पार्किंगच्या ६१ प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली. याशिवाय मोटार वाहन कायद्यांतर्गत अन्य १ हजार ५७ प्रकरणे नोंदविण्यात आली. या सर्व कारवायांतून ११ लाख ६९ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
हरविलेले १७ जण सापडले; ४२ मोबाईल परत
मोहिमेदरम्यान हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यावरही भर देण्यात आला. यात पाच महिला, सात पुरुष आणि पाच मुली अशा एकूण १७ जणांचा शोध लागला. हरविलेले तसेच चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी CEIR पोर्टलचा वापर करण्यात आला. त्याद्वारे ४२ मोबाईल हस्तगत करून ते त्यांच्या मूळ मालकांना परत देण्यात आले.
भंगार दुकाने, पानटपऱ्या आणि लॉजेसची तपासणी
जिल्ह्यातील १९० भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिनियमाच्या कलम १२४ अन्वये पाच गुन्हे दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्यात आली. पानटपऱ्यांवर तंबाखू नियंत्रण कायद्यान्वये (COTPA) १०० गुन्हे दाखल करण्यात आले असून, २० हजार रुपयांचा दंड अथवा मुद्देमालाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय १८० हॉटेल्स आणि लॉजेसची तपासणी करण्यात आली.
सराईत आणि हद्दपार आरोपींवरही नजर
मोहिमेत ५०७ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ११ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. हद्दपारीचे आदेश असलेल्या आठ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १४२ अन्वये कारवाई करण्यात आली. तसेच ३७६ समन्स आणि १६१ वॉरंट बजावण्यात आले. मद्यप्राशन करून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या ७३ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात अवैध धंद्यांना थारा नाही
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही सुरू राहतील, असा निर्धार जिल्हा पोलीस दलाने व्यक्त केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा आणि त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकांनी या मोहिमेत सहभाग घेतला.






