जिल्हापेठ पोलिसांची मोठी कामगिरी; ११ मोटारसायकलींसह तीन चोरटे जेरबंद
तांत्रिक तपास, सीसीटीव्ही व गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई; ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यात जिल्हापेठ पोलीस स्टेशनने मोठे यश मिळविले आहे. विशेष तपास मोहिमेद्वारे पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्ह्यांचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एकूण ११ चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त वाहनांची एकूण किंमत ४ लाख ३० हजार रुपये इतकी असून या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी आळा बसण्यास मदत झाली आहे.
जळगाव शहरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना दाखल गुन्ह्यांचा तातडीने छडा लावून चोरीस गेलेली वाहने हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांनी विशेष तपास पथकाची स्थापना करून वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा सखोल तपास सुरू केला.
सीसीटीव्ही, तांत्रिक तपासातून पहिला आरोपी जाळ्यात
जळगाव शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकलप्रकरणी दाखल गुन्हा क्रमांक २१९/२०२६ (कलम ३०३(२), भारतीय न्याय संहिता) याचा तपास सुरू असताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे जियाउलहक अब्दुलहक शेख (वय ३४, रा. आझादनगर, अडावद, ता. चोपडा) याला ताब्यात घेतले.
७ दुचाकी केल्या हस्तगत
सखोल चौकशीत आरोपीने जळगावसह विविध ठिकाणी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून २ लाख २० हजार रुपये किमतीच्या सात मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या वाहनांची चोरी जिल्हापेठ, पारोळा, शिरपूर, चोपडा, यावल तसेच मध्यप्रदेशातील विविध ठिकाणांहून झाल्याचे निष्पन्न झाले असून संबंधित पोलीस ठाण्यांशी समन्वय साधून पुढील तपास सुरू आहे.
दुसऱ्या गुन्ह्यात तीन मोटारसायकली हस्तगत
गुन्हा क्रमांक १०७/२०२६ च्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे उमेश प्रदीप पाटील (वय २२, रा. पिंगळवाडी, ता. अमळनेर, ह.मु. रायपूर एमआयडीसी, जळगाव) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेही विविध ठिकाणी मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून १ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या वाहनांचा संबंध एमआयडीसी व फुले मार्केट परिसरातील चोरीच्या गुन्ह्यांशी असल्याचा संशय असून तपास सुरू आहे.
पेट्रोलिंगदरम्यान तिसरा आरोपीही ताब्यात
१७ जुलै रोजी नियमित पेट्रोलिंगदरम्यान कैलास वसंतदास मथुरे (वय २८, रा. जुनोने, ता. जामनेर) हा संशयास्पदरीत्या हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकलसह फिरताना आढळला. चौकशीत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. तपासात संबंधित वाहन हे सोयगाव पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक ९७/२०२४ मधील चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून ३५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करून आरोपी व वाहन पुढील कारवाईसाठी सोयगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
जळगाव पोलीस दलाकडून वाहनचोरी रोखण्यासाठी सातत्याने विशेष कारवाया सुरू असून नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करणे, लॉक व इतर सुरक्षा साधनांचा वापर करणे तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती देण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.
पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वात सफौ संजय दोरकर, पोलीस हवालदार महेश महाजन, महेंद्र पाटील, किरण वानखेडे, जितेंद्र सुरवाडे, राजेश पदमर, संतोष सोनवणे, तेजस मराठे, अमित मराठे, प्रशांत सेंदाणे, प्रवीण जाधव, अजय सपकाळे, कमलाकर बडगुजर, नरेंद्र दिवकेर, संजय लाटे आणि अजय आहिरे यांनी पार पाडली आहे.





