लासूर-हातेड रस्त्यावर ७ किलो ११६ ग्रॅम गांजा पकडला !
तीन आरोपी अटकेत,चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

लासूर-हातेड रस्त्यावर ७ किलो ११६ ग्रॅम गांजा पकडला !
तीन आरोपी अटकेत,चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
चोपडा | प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त केला असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत गांजा, कार, मोटारसायकल आणि मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ८ हजार ९०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.५३ वाजता लासूर ते हातेड जाणाऱ्या रस्त्यावरील पाटचारीजवळ, हातेड शिवारात चोपडा ग्रामीण पोलीस पथक गस्त घालत असताना एका संशयित वाहनाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कारमध्ये लपवून ठेवलेला ७ किलो ११६ ग्रॅम गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून वाहनातील तिघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विष्णू सुभाष सुळे (वय ३७, रा. पिंप्री, जि. पुणे), प्रकाश बबन शिंदे (वय ३०, रा. टाकळीमिया, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) आणि प्रशांत ताराचंद अथाणी (वय २९, रा. टाकळीमिया, देवळालीप्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांचा समावेश आहे.
कारवाईदरम्यान आरोपींकडून १,७७,९०० किमतीचा गांजा, ३ लाखांची हुंडाई सॅन्ट्रो कार, ₹९० हजारांची पल्सर मोटारसायकल तसेच ४१ हजार किमतीचे विविध कंपन्यांचे पाच मोबाईल फोन असा एकूण ६,०८,९०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४६/२०२६ अन्वये अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act), १९८५ मधील कलम २०(ब) व २२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अमली पदार्थांचा पुरवठा आणि तस्करीची साखळी उघड करण्याच्या दृष्टीने पोलीस पुढील तपास करीत आहेत.





