महा पोलीस न्यूज इम्पॅक्ट : नूतन पोलीस अधिक्षकांचा धडाका, वाळूमाफियांचे धाबे दणाणले!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । अवैध धंद्यांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविणारे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारताच आपल्या आक्रमक कार्यशैलीचा परिचय दिला आहे. ‘महा पोलीस न्यूज’ने जिल्ह्यातील काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुरू असलेल्या सुसाट अवैध वाळू वाहतुकीबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत पोलीस प्रशासनाने सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई केली असून, यात तब्बल ५५ लाख रुपयांची ८ वाहने जप्त करण्यात आली आहेत.
‘महा पोलीस न्यूज’च्या बातमीचा परिणाम
जळगाव तालुका, नशिराबाद आणि इतर परिसरातील वाळू वाहतुकीवर ‘महा पोलीस न्यूज’ने प्रकाश टाकला होता. या बातमीची गांभीर्याने दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि २४ एप्रिलच्या कारवाईनंतर पुन्हा २५ एप्रिल रोजी जिल्हयात एकाच वेळी विशेष मोहीम राबवली.
५५ लाखांची ८ वाहने जप्त
जळगाव जिल्हा पोलीस दलाने केलेल्या या संयुक्त कारवाईत एकूण ८ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. या मोहिमेत ४२ हजाराची अवैध वाळू जप्त करण्यात आली आहे. त्यात धरणगाव पो.स्टे. ३ ट्रॅक्टर, जळगाव तालुका पो.स्टे. २ डंपर, एम.आय.डी.सी. पो.स्टे. ३ डंपर असे एकूण ८ वाहने ५५ लाख रुपये किंमत असे जप्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, जळगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी एम.आय.डी.सी. पोलीस पथकासह स्वतः प्रत्यक्ष मैदानात उतरून ३ डंपर जप्त केले आहेत.
अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची ‘अँक्शन मोड’ मधील कार्यशैली
जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सूचना देत मार्गदर्शन सुरू केले आहे. त्यांच्या या धडाकेबाज मोहिमेमुळे जिल्ह्यातील वाळूमाफियांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, गुन्हेगारांना जरब बसण्यास सुरुवात झाली आहे. केवळ कागदावर कारवाई न करता प्रत्यक्ष जप्ती आणि गुन्हे दाखल करण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे.
पुन्हा कारवाईचा बडगा
जप्त करण्यात आलेल्या सर्व ८ वाहनांवर बी.एन.एस. २०२३ चे कलम ३०३ (२) सह मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे. “अवैध खनिज संपत्तीची चोरी करणाऱ्यांविरुद्ध अशी कारवाई निरंतर सुरू राहील,” असा कडक इशारा पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
ही यशस्वी मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) आणि अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत (जळगाव परिमंडळ) यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.





