शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज सादर करण्यास ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज सादर करण्यास ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे सहाय्यक संचालकांचे आवाहन
जळगाव महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी पात्र विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याने विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जळगाव कार्यालयात भेट देऊन विहित मुदतीत ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत.
जळगाव शहरातील मुलांचे शासकीय वसतिगृह शिव कॉलनी येथे, तर मुलींचे शासकीय वसतिगृह गिरणा पाणी टाकीजवळ, वाघ नगर रोड जळगाव येथे कार्यरत आहे.
पात्र विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विशाल पंढरीनाथ राठोड, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जळगाव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.







