महापालिकेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी नगरसेवक प्रशिक्षणाला रवाना
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे नाशिक येथे आयोजन

महापालिकेची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी नगरसेवक प्रशिक्षणाला रवाना
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे नाशिक येथे आयोजन
जळगाव : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने जळगाव शहर महानगरपालिकेच्या नगरसेवकांसाठी नाशिक येथे शुक्रवार, दि. ७ आणि ८ ऑगस्ट रोजी दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नगरसेवकांना महानगरपालिकेच्या कामकाजाची प्रत्यक्ष कार्यपद्धती आणि नियमावलीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
यंदाच्या महापालिकेत नवनिर्वाचित नगरसेवकांची संख्या मोठी आहे. नगरसेवकांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव मिळावा आणि महासभेत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे व अभ्यासू वृत्तीने मांडता यावेत, यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी हे प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. यापूर्वी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते; मात्र आचारसंहितेमुळे ते पुढे ढकलावे लागले होते.
या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरासाठी शुक्रवारी (७ ऑगस्ट) सकाळी ७ वाजता नगरसेवक महानगरपालिकेच्या प्रांगणातून खाजगी बसने नाशिककडे रवाना झाले.
“नगरसेवक प्रशिक्षित असणे अत्यंत गरजेचे आहे. महापालिकेत विकासकामे मार्गी लावण्यासाठी आणि महासभेत लोकप्रश्न अभ्यासू पद्धतीने मांडण्यासाठी हे प्रशिक्षण नगरसेवकांसाठी मैलाचा दगड ठरेल.”
— दीपमाला काळे, महापौर (जळगाव शहर महानगरपालिका)







