Crime

गोलाणी मार्केटमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ! एक दुकान फोडले, दोन दुकानांचे लॉक तोडण्याचा प्रयत्न

५० हजारांचे फोन लंपास; सीसीटीव्हीत चार संशयित कैद

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील व्यापारी आणि व्यावसायिकांची वर्दळ असलेल्या गोलाणी मार्केटमध्ये चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याची घटना समोर आली आहे. मार्केटमधील एका मोबाईल दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ५० हजार रुपये किमतीचे मोबाईल लंपास केले, तर अन्य दोन दुकानांचे लॉक तोडून चोरीचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, एका दुकानात तब्बल ३० ते ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल असताना सेंट्रल लॉकमुळे मोठी चोरी टळली. या घटनांमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सनशाईन मोबाईल दुकानाचे लॉक तोडले
गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावरील दुकान क्रमांक ८ मधील सनशाईन मोबाईल या दुकानाला चोरट्यांनी लक्ष्य केले. दुकानमालक सौरभ खियलदास केसवानी (वय ३०, रा. शिला प्राईड, टी.एम. नगर, जळगाव) यांनी रात्री साडेनऊ वाजता दुकान बंद केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता, दुकानाच्या बाजूचे लॉक आणि कडी तोडण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, दुकानाला असलेल्या सेंट्रल लॉकमुळे चोरट्यांचा डाव फसला. दुकानात सुमारे ३० ते ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल असल्याची माहिती आहे. सेंट्रल लॉक नसते, तर मोठे आर्थिक नुकसान झाले असते.

मोबाईल दुकान फोडले; दुरुस्तीसाठी आलेले फोन चोरी
गोलाणी मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील विशाल मोबाईल या दुकानात चोरट्यांनी प्रत्यक्ष चोरी केली. दुकानमालक विशाल मधुकर शिंपी (वय ४५, रा.कुसुंबा) यांनी रात्री साडेसात वाजता दुकान बंद केले होते. आज सकाळी आठ वाजता शेजारील दुकानदाराचा फोन आल्यानंतर त्यांना चोरीची माहिती मिळाली. दुकानाचे कुलूप तोडून शटर उघडण्यात आले होते. चोरट्यांनी दुकानातील दुरुस्तीसाठी आलेले अंदाजे ५० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल चोरून नेले. तसेच दुकानातील ड्रॉवरही फोडण्यात आला.

फूटवेअरचे लॉक तोडले; माल थोडक्यात बचावला
गोलाणी मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील सी-१८० क्रमांकाच्या रुद्र फूटवेअर दुकानालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. दुकानाचे साईड लॉक तोडण्यात आले. मात्र, दुकानातील चोरी झालेली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुकानात अंदाजे दोन लाख रुपयांचा माल होता.

सीसीटीव्हीत चार जण कैद
गोलाणी मार्केटमधील या घटनांमुळे व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकाच मार्केटमधील तीन दुकानांना लक्ष्य करण्यात आल्याने या घटनांमागे एकाच टोळीचा हात आहे का, याबाबत तपासातूनच स्पष्टता येणार आहे. दरम्यान, या घटनांशी संबंधित चार जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटवून त्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर महत्त्वाचे आव्हान असणार आहे.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गोलाणी मार्केटसारख्या प्रमुख व्यावसायिक ठिकाणी घडलेल्या या घटनांमुळे रात्रीच्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, चोरट्यांचा छडा लावून व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button