पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संजय पाटील यांचा झाला सन्मान
सेवापूर्ती सोहळ्यात संजय पाटील सरांनी घेतले ११ गरीब विद्यार्थ्यांना दत्तक !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संजय पाटील यांचा झाला सन्मान
सेवापूर्ती सोहळ्यात संजय पाटील सरांनी घेतले ११ गरीब विद्यार्थ्यांना दत्तक !
पाळधी/धरणगाव/जळगाव प्रतिनिधी – धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक आणि शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी आपल्या सेवेला औपचारिक निरोप दिला. मात्र हा सोहळा केवळ त्यांच्या निवृत्तीचा नव्हता, तर एका ध्येयवेड्या शिक्षकाच्या कर्तृत्वाचा, निस्वार्थ सेवाभावाचा आणि माणुसकीच्या नात्यांचा उत्सव होता.
कार्यक्रमात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संजय पाटील सरांचा सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतात पालकमंत्री पाटील म्हणाले, संजय सरांची ही नोकरी नव्हती, तर विद्यार्थ्यांना घडवण्याचा एक ध्येयात्मक प्रवास होता. सेवा ही नोकरी नसते… ती एक तपस्या असते, समर्पण असतं. शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अमूल्य योगदान दिलं. केवळ पुस्तकांपुरतं ज्ञान न देता, चारित्र्य, कष्ट, आणि आत्मविश्वास यांचे धडे देणारे ते शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात आदराचे स्थान राखून आहेत. ते शिक्षक, मार्गदर्शक, पालक आणि स्नेही अशा अनेक भूमिका अत्यंत संवेदनशीलतेने पार पाडत आले.
संजय पाटील सरांनी घेतले ११ गरीब विद्यार्थ्यांना दत्तक
याच शाळेतून सेवानिवृत्त होत असतानाही त्यांनी सामाजिक बांधिलकीचं एक भावनिक उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं. या शाळेतील ११ गरीब व होतकरू मुला-मुलींचा पदवीपर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च मी उचलणार आहे,” अशी थेट घोषणा करत त्यांनी उपस्थितांचं अंतःकरण जिंकलं.एव्हढेच नाही तर त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी ५१ हजार रुपयांचा धनादेश शाळेला सुपूर्द केला. यावेळी उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे डोळे पानावले होते.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी संजय पाटील सर हे केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे, तर शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणूनही अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले आहेत. शिक्षण, सामाजिक सलोखा, आणि जनसेवा या त्रिसूत्रीवर त्यांनी आपलं आयुष्य उभं केलं आहे असे सांगितले
कार्यक्रमाच्या अखेरीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना पुढील सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत म्हटलं, “ध्येय आणि ऊर्जा तीच ठेवा, अजूनही समाजासाठी खूप लढायचं आहे. निवृत्ती ही केवळ सरकारी संकल्पना असते – कार्य करणारा माणूस कधीच सेवानिवृत्त होत नाही.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय पाटील सर यांचा सपत्नीक सहपरिवार शाल श्रीफळ भेटवस्तू देऊन सत्कार केला. तसेच चोपड्याचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत जी सोनवणे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी संजय पाटील सर यांचा सत्कार सत्कार केला.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार भाजपाचे ज्येष्ठ नेते डी जे पाटील सुभाष अण्णा पाटील मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव नन्नवरे रवींद्र चव्हाण सर रमेश आप्पा पाटील राजेंद्र चव्हाण हेडगेवारचे उपसरपंच चंदन पाटील दिलीप बापू पाटील संचालिका संस्थेच्या संचालिका रेखाताई पाटील महेंद्र भोईटे वाय.पी पाटील सुनील पाटील प्रेमराज पाटील धनराज पाटील सर प्राध्यापक अशोक पवार नाटेश्वर पवार गजानन पाटील खैरनार सर घुगे सर किशोर पाटील, राहुल पाटील, अमोल पाटील संजय माळी, चोरगावचे सरपंच ज्ञानेश्वर सोनवणे , भागवत पाटील, सुभाष पाटील, गुलाब पाटील सर, शांताराम पाटील , आनंदा पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील विविध मान्यवरांनी उपस्थिती देऊन संजय पाटील सरांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यात संजय सरांचे जुने सहकारी, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या साऱ्यांच्या उपस्थितीत झालेला हा क्षण एक प्रेरणादायी, भावनाशील आणि संस्मरणीय सोहळा ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव पाटील सर यांनी केले प्रास्ताविक धनराज पाटील सरांनी तर आभार पी.ए. पाटील सर यांनी मानले. दोनगाव येथील माध्यमिक विद्यालयात सदरचा सेवानिवृत्तीचा नव्हे तर कर्तुत्वाचा सोहळा पार पडला.