ड्रग्सचा विळखा : जळगाव पोलिसांना म्होरक्या गवसेना!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात एमडी ड्रग्स आणि इतर अंमली पदार्थ बिनधास्तपणे विक्री केले जात आहे. चौकाचौकात अंमली पदार्थ मिळत असून पोलिसी कारवाया देखील होत आहे मात्र ड्रग्स पुरविणारा मोठा मासा आणि म्होरक्या गळाला लावण्यास पोलीस प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही. तपासाचे धागेदोरे योग्य पद्धतीने जात नसावे किंवा कुणीतरी मुद्दाम कानाडोळा केल्याशिवाय हे शक्य नाही.
जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रीचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. गेल्या काही वर्षात गांजा, भांग, अफीम नव्हे तर एमडी आणि ब्राऊन शुगर देखील जळगावात मिळू लागली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्रौढ देखील अंमली पदार्थाच्या आहारी गेले आहे. मधल्या काळात जळगावातील बडे मासे देखील या धंद्यात उतरले होते, परंतु त्यानंतर अनेकांनी फास्ट मनी मिळवण्याच्या प्रयत्नात या धंद्यात आपले पाय रोवले.
मध्यवर्ती भागात होतेय विक्री, असे आहेत दर
जळगाव शहरात शाहूनगर परिसर, तांबापुरा, मास्टर कॉलनी, हुडको आणि काही प्रमाणात गेंदालाल मील, कंजरवाडा परिसर, शनिपेठ याठिकाणी देखील ड्रग्स आणि अंमली पदार्थांची विक्री केली जाते. बऱ्याच विक्रेत्यांचे ग्राहक ठरलेले असून ते नियमित ग्राहकांना माल देतात मात्र काही नवखे कुणालाही माल विक्री करतात. गांजा, भांग ५० रुपयापासून तर हजारोपर्यंत आणि ड्रग्स ५०० रुपयापासून विक्री सुरु होते.
गुन्हे दाखल होतात मात्र धागेदोरे अपूर्णच..
जळगाव जिल्ह्यात आजवर ड्रग्स पकडल्याचे जवळपास ५-६ गुन्हे दाखल झालेले आहे. रावेर, भुसावळ, जळगावात गुन्हे दाखल झाले असून त्यात लाखोंचे ड्रग्स देखील पोलिसांनी हस्तगत केले आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर १ किंवा २ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकतात मात्र पुढे त्या गुन्ह्याचा तपास करताना त्याच्या मोबाईलचे सीडीआर आणि इतर पुरावे तपासले तरी मुख्य म्होरक्या काही पोलिसांच्या गळाला लागत नाही. जवळपास प्रत्येक गुन्ह्यात हेच झालेले दिसून येते.
मोठे मासे, म्होरक्या कुठे?
जळगावातील ड्रग्स विक्रीत अनेक दिग्गजांचा हात असल्याची दबक्या आवाजात चर्चा होत असते. बऱ्याचदा काही पोलीस देखील काही आरोपींच्या संपर्कात असतात मात्र ते त्या ओळखीला खबरी असल्याचे सांगतात. शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ येत असताना स्थानिक पोलीस ठाण्यातील गोपनीय यंत्रणा आणि डीबी कर्मचारी काय करतात? हा मात्र मोठा प्रश्न आहे. कोणतेही मोठे कोम्बिंग ऑपरेशन राबवले जात नसल्याने स्थानिक पोलिसांचे लागेबांधे आहेत कि काय असा देखील प्रश्न निर्माण होत आहे?
अंमली पदार्थांचे खोलवर दुष्परिणाम
अंमली पदार्थांचे सेवन मानवी जीवनावर अनेक गंभीर दुष्परिणाम करते. शारीरिकदृष्ट्या, यामुळे मेंदू, हृदय, यकृत आणि मूत्रपिंडांवर विपरीत परिणाम होतो, रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि मृत्यूचा धोका वाढतो. मानसिकदृष्ट्या, नैराश्य, चिंता, भावनिक अस्थिरता आणि व्यसनाधीनता यांसारख्या समस्या उद्भवतात. सामाजिकदृष्ट्या, कौटुंबिक आणि आर्थिक समस्या वाढतात आणि गुन्हेगारीत वाढ होते. अंमली पदार्थांच्या सेवनाने व्यक्तीचे जीवन उद्ध्वस्त होते आणि समाजावरही नकारात्मक परिणाम होतो.