दुर्दैवी : झोका खेळताना जीवावर बेतले, शाळकरी मुलाचा करूण अंत

महा पोलीस न्यूज । दि.८ जुलै २०२५ । जळगाव शहरातील विद्यानगर परिसरात सोमवारी दि.७ जुलै रोजी दुपारी घडलेल्या एका दुखद घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. खेळताना दोरीच्या फासात अडकून १२ वर्षीय हार्दिक प्रदीपकुमार अहिरे या मुलाचा करुण अंत झाला. या घटनेमुळे अहिरे कुटुंबावर मोठा आघात झाला असून, रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीपकुमार अहिरे हे विद्यानगरात आपल्या कुटुंबासह राहतात. ते रावेर तालुक्यातील केरहाळे येथील एका माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. २०१५ मध्ये प्रदीपकुमार आणि त्यांच्या पत्नीने पुण्यातील एका संस्थेतून ९ महिन्यांच्या हार्दिकला दत्तक घेतले होते. हार्दिक त्यांच्या कुटुंबासाठी आनंदाचा किरण होता.
सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास हार्दिक शाळेतून घरी परतला. चहा आणि बिस्किटे खाल्ल्यानंतर, त्याची आई आपल्या लहान मुलाला, प्रसादला, ट्यूशनसाठी घेऊन बाहेर गेली. यावेळी हार्दिक शेजारी राहणाऱ्या पदमसिंह राजपूत यांच्या घरी खेळण्यासाठी गेला. खेळत असताना छताला बांधलेल्या दोरीत अचानक त्याचा गळा अडकला. त्यावेळी घरात कोणीही उपस्थित नव्हते.
काही वेळाने शेजारी राहणाऱ्या एका महिलेने ही धक्कादायक घटना पाहिली आणि तात्काळ आरडाओरड केली. हार्दिकच्या आईला ही बातमी समजताच त्या घाबरल्या आणि त्यांनी मोठा आक्रोश केला. हार्दिकला तातडीने खासगी वाहनाने जवळच्या रुग्णालयात नेले गेले, तिथून त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर हार्दिकला मृत घोषित केले.
या घटनेने विद्यानगर परिसरात शोककळा पसरली आहे. एका चिमुकल्याचा खेळताना झालेला असा अनपेक्षित अंत पाहून नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी प्रचंड दुखः व्यक्त केले. ही घटना सर्वांसाठी धक्कादायक ठरली आहे.